मंदिरांच्या माध्यमातून धर्मकार्य वाढवण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !
फोंडा (गोवा) येथे मंदिर संस्कृतीच्या सक्षमीकरणासाठी ‘मंदिर महासंघ संयोजक कार्यशाळे’ला प्रारंभ !
फोंडा (गोवा), २२ नोव्हेंबर (वार्ता.) – मंदिरांच्या माध्यमातून धर्मकार्य वाढवण्याचा निर्धार महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी येथे ‘मंदिर महासंघा’च्या वतीने आयोजित ‘मंदिर महासंघ जिल्हा संयोजक कार्यशाळे’त केला.
३ दिवसांच्या या कार्यशाळेला २२ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ झाला. २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार्या या कार्यशाळेत वरील ३ राज्यांतील विविध देवस्थाने आणि मंदिरे यांचे विश्वस्त सहभागी झाले आहेत. कार्यशाळेचे उद़्घाटन दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आले. चिपळूण येथील श्रीक्षेत्र परशुराम मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, ‘देवस्थान सेवा समिती विदर्भ’चे सचिव अधिवक्ता अनुप जयस्वाल आणि मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
१. कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करतांना श्री. घनवट म्हणाले की, सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांच्या स्वाधीन व्हावीत, मंदिरांतील समन्वय वाढावा, संपर्काच्या माध्यमातून संघटन वृद्धींगत करावे, मंदिरांचे सुव्यवस्थापन व्हावे आणि प्रत्येक मंदिर सनातन धर्मप्रसाराचे केंद्रे व्हावे, या पंचसूत्रीच्या माध्यमातून मंदिरांच्या संयोजकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यातूनच मंदिरांचे संघटन होण्यास बळ मिळेल.
२. मंदिर महासंघाच्या कार्याची ध्येय-धोरणे काय आहेत ?, यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी माहिती दिली.
३. मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंचे व्यापक संघटन करण्यासाठी आपल्या क्षेत्रात तालुका, तसेच जिल्हा स्तरांवर संघटनात्मक बांधणी कशी असावी ?, याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
४. यासह ‘मंदिरांचे संघटन करतांना येणार्या कायदेविषयक अडचणी, संयोजक म्हणून कार्य करतांना आपली योग्य भूमिका, आपली आचारसंहिता, तसेच मंदिराची वास्तूरचना’, या संदर्भातही या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंदिर संघटनाच्या या कार्यास ईश्वरी अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी साधनेची आवश्यकता आणि स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया यांविषयीचे मार्गदर्शनही या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाप्रत्येक मंदिर सनातन धर्मप्रसाराचे केंद्र झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही, हे हिंदूंनी जाणावे ! |