Ayurveda Cures Cancer : नवज्योत कौर सिद्धू यांना आयुर्वेदाने दिले नवजीवन; चौथ्या टप्प्यातील कर्करोगावर यशस्वी मात !
अमृतसर (पंजाब) – माजी खासदार आणि क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन वर्षे कर्करोगाशी लढा दिल्यानंतर या आजारावर आता मात केली आहे. नुकतेच अमृतसरमधील ‘पॅट स्कॅन’ चाचणीद्वारे याची पुष्टी झाली. चौथ्या टप्प्यातील कर्करोगाशी झुंज देत असलेल्या नवज्योत कौर यांना आयुर्वेदाने नवीन जीवनदान दिले आहे.
याविषयी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, एप्रिल २०२२ मध्ये जेव्हा ते कारागृहात होते, तेव्हा त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ते म्हणाले, ‘‘नवज्योत कौर यांच्यावर यमुनानगर येथे उपचार चालू होते. तेथील डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांची बरे होण्याची केवळ ५ टक्के शक्यता आहे. अमेरिकेतील एका डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत ‘नो चान्स’ (जगण्याची शक्यता नाही) असे म्हटले होते. तो फार वेदनादायक काळ होता. मी देश-विदेशांतील अनेक डॉक्टरांशी बोललो. आयुर्वेदात कर्करोगावर उपचार शोधण्याचा प्रयत्नही केला.
आयुर्वेदानुसार, ‘मी सकाळी नवज्योत कौर यांना गरम पाण्यात लिंबू पिळून देणे चालू केले. यासह कच्ची हळद, लसूण, सफरचंद सायडर व्हिनेगर, कडुनिंबाची पाने, तुळस, अर्धक, डाळीची साखर, काळी मिरी, लवंग, लहान वेलदोडे देणेही चालू केले. मी त्यांना ब्लूबेरी, डाळिंब, आवळा, बीटरूट, गाजर आणि पांढर्या भोपळ्याचा रस देणे चालू केले. त्यांना पीठ आणि तांदळाऐवजी बदामाच्या पिठाच्या पोळ्या आणि भाज्या दिल्या. कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात आंबट आणि कडू पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात.’’
४० दिवसांनंतर, नवज्योत कौर यांची शस्त्रक्रिया झाली आणि नंतर पॅट स्कॅन करण्यात आले. आता नवज्योत कौर यांचा अहवाल आला, तेव्हा त्यात एकही कर्करोगाची पेशी नव्हती. ‘आयुर्वेदाने माझ्या पत्नीला नवीन जीवन दिले आहे’, असे सिद्धू यांनी सांगितले.