Vrindavan Dharma Sansad : देशी गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याची मागणी !

वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील धर्म संसदेत ६ ठराव संमत !

धर्म संसदेत उपस्थित संत

मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे झालेल्या धर्म संसदेत ६ ठराव संमत करण्यात आले. सरकारने या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी संतांनी केली आहे. यात विशेषतः देशी गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. ‘श्रीकृष्ण साधक ट्रस्ट’च्या सभागृहामध्ये झालेल्या धर्म संसदेचे उद्घाटन करतांना ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासभे’चे उपाध्यक्ष बिहारी लाल वशिष्ठ यांनी उत्तरप्रदेश सरकारला संपूर्ण ब्रज मंडळाला ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा, तसेच अंडी, मांस आणि दारू यांसारख्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला.

१. संत स्वामी रामेशानंद गिरी यांनी केंद्र सरकारला राष्ट्रीय नागरिक नोंदणी, एकसमान शिक्षण, लोकसंख्या नियंत्रण, लव्ह जिहाद नियंत्रण इत्यादी कायदे तात्काळ लागू करण्याचा प्रस्ताव दिला.

२. धर्म संसदेला उपस्थित राहिलेल्या जगन दास राठोड यांनी श्रीकृष्णजन्मभूमी परिसरातून शाही ईदगाह आणि मीना मशीद हटवण्याची, तेथील दैनंदिन नमाजपठण त्वरित बंद करण्याची, तसेच शाही ईदगाहचे (श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मशीद) लवकर सर्वेक्षण करण्याची मागणी केली.

३. आचार्य बलराम दास यांनी देशी गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली. किमान उत्तरप्रदेश सरकारने महाराष्ट्राच्या धर्तीवर आपल्या राज्यातील देशी गायीला ‘राजमाता’चा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.

४. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष दिनेश शर्मा म्हणाले की, हे सर्व प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडे पाठवले जातील आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाईल.

संपादकीय भूमिका

मुळात धर्म संसदेला आणि त्यात सहभागी संत आणि धर्मगुरु यांना अशी मागणीच करावी लागू नये, सरकारने स्वतःहून हे करणे आवश्यक आहे !