हिंदूंच्या परंपरा मोडीत काढण्याचा छुपा हेतू !
दिवाळी हा सण सर्वांनीच उत्साहात आणि आनंदात साजरा केला. दिवाळीत आपल्या प्रियजनांना पुस्तके भेट देऊन ‘ज्ञानाची दिवाळी साजरी करा ! ‘फटाके नको ! पुस्तके द्या ! डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २५ पुस्तिका सवलतीच्या दरात फक्त रु. ५०० मध्ये घरपोच !’, अशा आशयाचे लिखाण अंनिसने सामाजिक माध्यमावर प्रसारित केली होती. भारतीय संस्कृती, प्रथा आणि परंपरा, सण-उत्सव यांना कायम विरोध करणार्या अंनिसला पुस्तके विकण्यासाठी हिंदूंचाच सण बरा चालतो ! ‘होळीच्या दिवशी पोळी दान करा’; गणेशोत्सव आला की, मूर्तीदान करा; दिवाळी आली की, फटाके उडवू नका; महाशिवरात्र आली की, पिंडीवर दूध वाहू नका अशा वेळीच असे उपक्रम राबवले जातात. यातून हिंदूंच्या प्रथा-परंपरा मोडीत काढण्याचा अंनिसचा छुपा हेतू उघड होतो.
दिवाळीत असणार्या प्रत्येक दिवसाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ते सांगायचे सोडून ‘दिवाळीत आपल्या प्रियजनांना पुस्तके भेट देऊन ज्ञानाची दिवाळी साजरी करा !’, असे सांगून अंनिस हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी ‘ब्र’ही न काढणारी अंनिस हिंदूंचे सण आले की, लगेच फुकाचे सल्ले देण्याची भूमिका घेते, हे लक्षात घ्या ! बकरी ईदच्या दिवशी ‘बकरी न कापता पुस्तके भेट द्या’, असे आवाहन अंनिस कधी का करत नाही ? किंवा ख्रिसमसला झाडे तोडण्याऐवजी पुस्तके भेट देण्याचा सल्ला का दिला जात नाही ? १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दिवाळी उत्सव चालू आहे. दिवाळी भारतातच नव्हे, तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते. सण, व्रते अन् उत्सव केवळ रूढी म्हणून साजरे न करता त्यामागील धर्मशास्त्र जाणून घेऊन साजरे केले, तर ते अधिक श्रद्धापूर्वक साजरे केले जातात. सण आणि व्रते यांद्वारे मिळणारी सात्त्विकता आपण ग्रहण करू शकतो. त्यामुळे या सात्त्विकतेपासून हिंदूंना वंचित ठेवण्यासाठी अंनिस हिंदूंना संभ्रमित करत आहे. हिंदूंमध्ये धर्माभिमानाचा अभाव असल्याने अंनिससारख्यांचे फावते. सण-उत्सवांचे माहात्म्य, त्या दिवशी करावयाच्या कृतीमागील शास्त्र हिंदूंना समजू नये, यासाठी अंनिसची ही उठाठेव असल्यामुळे हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्मशास्त्राप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत.