धावण्याच्या व्यायामाचे लाभ !

निरोगी जीवनासाठी व्यायाम – २९

आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यांतून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics)चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत.

मागील लेखांकात आपण आरोग्यविषयक जाणीवेचे महत्त्व आणि आवश्यकता पाहिल्या. या लेखात आपण ‘धावणे’ या व्यायामाची आवश्यकता, महत्त्व आणि लाभ पाहू.

या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856335.html

१. धावण्याचा व्यायाम कुणी करावा ?

‘धावण्याचा व्यायाम अतिशय उपयोगी आणि आरोग्याच्या दृष्टीने फार लाभदायक आहे. हा व्यायामाचा प्रकार अगदी लहान मुलांपासून प्रौढावस्थेपर्यंत उपयोगी आहे. यास थोडा ‍वेळ लागतो आणि साधनसामुग्रीची आवश्यकता नसते.

२. आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व

सध्या धावण्याच्या अनेक स्पर्धा किंवा ‘मॅरेथॉन’ आयोजित केल्या जातात. त्यामुळे ‘योग्य प्रकारे कसे धावावे (दौडावे) ?’, याची एक कलाच निर्माण झाली आहे; परंतु हे शास्त्र अवगत नसले, तरी साध्या धावण्यानेही लाभ होतो. आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने धावण्याचा व्यायाम पुष्कळ उच्च स्तराचा (दर्जाचा) आहे. या व्यायामाचा परिणाम हृदय, फुप्फुसे आणि शरिरातील यकृत इत्यादींसारखी इंद्रिये यांच्यावर फार चांगला होतो. यामुळे मनुष्याच्या अंगी काटकपणा अधिक येतो. पुष्कळ काम करण्याची शक्ती अंगात येते. स्नायू जाड होत नाहीत; पण सशक्त (मजबूत) होतात आणि त्यांची शिथिलता दूर होते.

३. आरोग्य आणि शरीरसामर्थ्य मिळवण्यासाठी कशा प्रकारे धावावे ? 

धावण्याचा व्यायाम २ प्रकारे करू शकतो. अल्प पल्ल्याचे अंतर धावण्यासाठी (अल्प पल्ल्याच्या दौडीसाठी, म्हणजे १००, २००, ४०० यार्ड – १ यार्ड म्हणजे ३ फूट.) शक्ती आणि तडफ लागते अन् लांब पल्ल्याच्या धावेसाठी (१ ते २७ मैलांच्या दौडीसाठी – १ मैल म्हणजे १.६ किलोमीटर) शरिराच्या क्षमतेची (दमाची / स्ट्रेंथ) परीक्षा होते. ‘आरोग्य आणि शरीरसामर्थ्य मिळवण्यासाठी कशा प्रकारे धावावे (दौड करावी) ?’, याचा विचार येथे करावयाचा आहे.

३ अ. धावण्याच्या व्यायामाचा आरंभ कसा करावा ? : नुसत्या व्यायामाच्या दृष्टीने धावण्याचा व्यायाम करावयाचा असेल, तर त्यास धावण्याच्या कलेचे शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. काही ठराविक नियम पाळले, तर त्याचा पूरेपूर लाभ शरिराला मिळतो. आरोग्याच्या दृष्टीने धावायचे, तर सावकाश धावावे. नव्याने आरंभ करतांना सारखे सावकाश धावण्यापेक्षा थोडे अंतर जोराने चालावे, नंतर धावण्यास आरंभ करावा. जरा अधिक श्वास (दम) लागल्यासारखे वाटले की, पुन्हा चालावे आणि दम न्यून झाल्यासारखे वाटले, म्हणजे पुन्हा थोडे धावावे. याप्रमाणे केल्यास नवीन धावण्याचा व्यायाम (दौड) आरंभ करणार्‍यास फार सोयीचे जाते. नंतर थोडे दिवस सवय झाली, म्हणजे एका गतीने धावावे. (एक सारखी दौड करावी.)

३ आ. धावण्यासाठी योग्य जागा : धावणे घरातील चौकात, अंगणात किंवा घरातील एखाद्या मोठ्या खोलीत अथवा आखाड्यातील कुस्तीच्या हौदातही करता येते. बंदिस्त ठिकाणी धावण्यापेक्षा (दौड करण्यापेक्षा) मोकळ्या मैदानात किंवा बागेत गावाबाहेर धावावे; पण बाहेर जाऊन धावणे सोयीचे नसेल, तर न धावण्यापेक्षा बंद जागेत धावणे बरे.

३ इ. किती वेळ धावावे ? : अंगास घाम येऊन थकवा वाटेपर्यंत धावावे (दौड करावी). धावण्याचा (दौडीचा) व्यायाम केल्याने जो लाभ होतो, तो धावण्याचे कष्ट (मेहनत) बंद केले, तरी पुष्कळ दिवस टिकतो.

४. धावण्याच्या व्यायामाने होणारे लाभ

अ. धावण्याच्या व्यायामाने शरीर हलके होऊन पुष्कळ काम करण्याची अंगात शक्ती येते.

आ. कुस्ती, मल्लखांब, दंड-बैठका वगैरे अवजड प्रकारचे व्यायाम करणारेही शरिराची क्षमता (दम / स्ट्रेंथ) आणि रग वाढवण्यासाठी धावण्याचा व्यायाम करतात.

इ. शुद्ध हवेमुळे फुप्फुसे स्वच्छ होऊन रक्त शुद्ध होते आणि सूर्यप्रकाशाचा लाभ होतो.

ई. धावतांना अमुक प्रकारचा पोषाख करण्याची आवश्यकता नाही. लंगोट मात्र अवश्य वापरावा. अलीकडे आखुड बाह्याचे सदरे आणि लांडी (आखुड उंचीची) चड्डी प्रचलीत आहे आणि हे कपडे सोयीचे आहेत. नुसत्या धोतराचा काचा मारून दौड केली तरी चालेल. धावतांना अंगातील इतर कपडे सैल असावेत.

५. धावण्याच्या व्यायामासंदर्भात सर्वसाधारण सूचना

अ. धावणे झाल्यानंतर अंगावर धोतर पांघरावे किंवा अंगात बंद छातीचा कोट घालावा, म्हणजे अंग निवतांना (शरिरातील उष्मा शांत होतांना) अंगास वारा लागून अपाय होणार नाही.

आ. धावतांना छाती पुढे काढून आणि हात कोपरांतून वाकवून अन् अंगाच्या बाजूस धरून (जवळ धरून) धावावे.

इ. चांगली सवय झाली, म्हणजे मधून मधून धावण्याची गती वाढवावी आणि पुन्हा न्यून करावी, म्हणजे क्षमता (दम) चांगली वाढते अन् अंगात तडफ येते. हा व्यायाम पुरुषांप्रमाणे स्त्रियांसाठीही उपयोगी आहे.

ई. रस्त्याने धावतांना पहाणारे हसतील; म्हणून धावणे बंद करण्याची आवश्यकता नाही. आपण स्वत:च्या शरिरासाठी (आरोग्यासाठी) धावतो.

उ. धावतांना रस्ता नीट नसेल, तर अनवाणी धावणे चांगले नाही. पायांत कापडी सैल जोडे (बूट) घालावेत. चामड्याचे जोडे (बूट) असले तरी हरकत नाही; पण त्यांत बोटे दाबली जाणार नाहीत, असे ते असावेत.

ऊ. वयस्कर, गंभीर रोग असलेल्यांनी, तसेच बरेच दिवस व्यायाम न केलेल्यांनी वैद्यकीय समादेशानुसारच धावण्याचा व्यायाम करावा.’

(साभार : शं. धों. विद्वांस, संपादक, मासिक ‘व्यायाम’, १५.२.१९५७)

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise