वृद्ध वा अनुभवी व्यक्ती यांच्या सेवेमुळे बुद्धीमत्ता वाढते !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : केन च बुद्धिमान् भवति ?
अर्थ : मनुष्य बुद्धीमान होतो, तो कशामुळे ?
उत्तर : वृद्धसेवया ।
अर्थ : वृद्धांची, अनुभवी व्यक्तींची सेवा केल्यामुळे मनुष्य बुद्धीमान होतो.
विवेकशीलता, योग्य वेळी योग्य तोच निर्णय घेण्याचे सामर्थ्य, म्हणजे बुद्धीमत्ता असते. केवळ पुस्तके वाचून किंवा विद्यालय-महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण करून ही योग्यता माणसाला प्राप्त होत नाही. शिक्षण पूर्ण झाले असले, तरी त्या त्या विषयातील व्यापक आणि खोल अनुभवासाठी अनुभवी तज्ञांच्या हाताखाली काही काळ राबावेच लागते. त्याविना उद्योगधंद्याला लागण्याचे संमतीपत्रही मिळत नाही, असा निर्बंध असतो.
‘तू वृद्धांची सेवा केली नाहीस; म्हणून तुझा गोंधळ उडाला. तुला योग्य निर्णय घेता आला नाही. तू नीट वागला नाहीस. काय बोलावे, कसे बोलावे, ते तुला समजले नाही’, असे उद्गार महाभारतामध्ये श्रीकृष्ण आणि भीष्म यांसारख्या अधिकारी व्यक्तींनी निरनिराळ्या प्रसंगात अनेक वेळा काढलेले आहेत.
प्रपंचामध्ये अनेक वेळा लहान लहान अडचणी उपस्थित होतात. तरुण स्त्री-पुरुष त्यामुळे गडबडून जातात. घरामध्ये ज्याला विचारावे, अशी कुणी म्हातारी व्यक्ती नसते. ‘म्हातारी व्यक्ती घरामध्ये असणे, हे आता कालबाह्य झाले आहे’, असे मानले जाते. तसा प्रसंग आलाच, तर त्यासाठी अलीकडे वृद्धाश्रमांची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्यांच्याविषयी प्रेम, आदर बाळगावा, अशा वृद्धांची संख्याही उणावली आहे, हेही खरे आहे. कुणी अनुभवी व्यक्ती घरामध्ये नसेल, तर अनेक वेळा फजितीचा प्रसंग येतो, हे मात्र खरे आहे. सेवा ही संतुष्ट आणि प्रसन्न करण्याचे उत्कृष्ट साधन आहे. त्यातून जिज्ञासूची नम्रता आणि ज्ञानग्रहणाची उत्कटता सहजपणे प्रत्ययास येते. या सेवाभावी वृत्तीतून तो जिज्ञासू पडतील, ते कष्ट झेलण्यास सिद्ध आहे, हेही लक्षात येते. त्यामुळे वृद्ध मंडळींनाही उत्साह वाटतो. ‘उपदेश कारणी लागेल, वाया जाणार नाही’, असा भरवसा त्यांना वाटतो. वृद्धांच्या सेवेमुळे बुद्धीमत्ता वाढते, हे या प्रश्नोत्तरातून जाणून घेतले पाहिजे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)