मतदार केंद्रांच्या संख्येत वाढ करणे आदी उपाययोजना केल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ ! – एस्. चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेली विशेष मुलाखत !
मुंबई – वर्ष २०१९ च्या तुलनेत या वर्षी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. म्हणजे राज्यात काही लाख मतदान वाढले. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ला मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम यांनी विशेष मुलाखतीमध्ये सांगितलेली सूत्रे वाचकांच्या माहितीसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. मतदानांत वाढ होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न !
एस्. चोक्कलिंगम म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत सुटीला धरून मतदानाचा दिवस होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मात्र आम्ही जाणीवपूर्वक आठवड्याच्या मधला वार निवडला. यामुळे सलग सुटी पाहून बाहेरगावी जाण्याचा प्रकार अल्प झाला. १८ वर्षे पूर्ण झालेले युवक-युवती यांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, यासाठी मतदानाच्या २ दिवस आधीही निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले गेले. दिव्यांग (विकलांग) आणि वयोवृद्ध नागरिक यांच्या निवासस्थानी जाऊन मतदान होण्यासाठी निवडणून आयोगाने विशेष मेहनत घेतली. निवडणुकीच्या कामावर असलेले पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनाही केंद्राच्या ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्वांमुळे मतदानाच्या टक्केवारीत काही प्रमाणात वाढ झाली.
२. मुंबई महापालिका आयुक्तांनी मतांमध्ये वाढ होण्यासाठीचे दायित्व पार पाडले !
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दायित्व देण्यात आले होते. यामुळे त्यांनी स्वत: आणि मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी चांगले प्रयत्न केले. याचा परिणाम मुंबईमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढले, असेही अधिकार्यांनी सांगितले.
३. नक्षलग्रस्त भागांतही जागृती केली !
महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्वच नक्षलग्रस्त भागांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव अल्प होत आहे, तसेच नक्षलग्रस्त भागांतही मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली. त्यामुळे नक्षलग्रस्त भागांत मतदानामध्ये वाढ झाली.
४. अद्यापही मतदार सूचीत गोंधळ होतो; प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न करू !
अनेक मतदार मतदानाच्या दिवशी मतदारसूचीत नाव आहे का ? हे पहातात. मतदारांनी जागरूक राहून आधीच मतदानसूचीत नाव आहे का, हे पहाणे अपेक्षित आहे. मतदानापूर्वी निवडणूक कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात मतदान सूची पहाव्या लागतात. हे काम विनाचूक होणे पुष्कळ कठीण ठरते. असे असले, तरी ही प्रक्रिया सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
५. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या त्रुटी यंदा टाळल्या !
वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांच्या ठिकाणी देण्यात येणार्या सुविधांमध्ये या वेळी अधिक सुधारण्या करण्याचा आम्ही प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या त्रुटीही आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात ९८ सहस्र मतदान केंद्रे होती; मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत १ लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत १५० सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या विधानसभा निवडणुकीत १ सहस्रांहून अधिक सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली. त्याचाही लाभ झाला.