कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानाची सिद्धता अंतिम टप्प्यात !
आळंदी (पुणे) – कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणार्या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोर्या होऊ नये, यासाठी देवस्थानाच्या व्यवस्थापनाने ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. याविषयी आळंदी देवस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले की, कार्तिकी वारीकाळात लाखो भाविक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी आळंदीत येतात. मंदिराच्या दक्षिण बाजूकडील आजोळ घराच्या जागेतील दर्शन मंडपामध्ये देवस्थानाचे शिपाई, तर इंद्रायणीकाठच्या दर्शन मंडपामध्ये स्वयंसेवी सेवाभावी स्वयंसेवकांकडून खिचडी, पाणी वाटप केले जाईल. याचबरोबर मंदिराच्या आतील बाजूस, दर्शन मंडपात आणि प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
वारीकाळात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या लाइव्ह दर्शनाची सोय देवस्थानाने केली आहे.
यासाठी मंदिरात, दर्शन मंडपात आणि पुंडलिक मंदिरात स्क्रीन बसवले जाणार आहेत. वारीसाठी बाहेरून येणार्या दिंड्यांना देवस्थानाकडून निमंत्रण दिले आहे. दिंड्यांचे मंदिर प्रवेश पास वाटप चालू आहे. सप्तमी आणि अष्टमीच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश दिला जाईल. सध्या देऊळवाड्यावर विद्युत् रोषणाई करण्याचे काम चालू आहे. याचबरोबर वारी काळात देऊळवाडा, समाधी गाभा आकर्षक फुलांनी सजवला जाणार आहे. वारीसाठी येणार्या वारकर्यांना संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची पारायण प्रत ८० रुपयांत ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री केली जाते. ५ सहस्र ज्ञानेश्वरी पहिल्या टप्प्यात छपाई करून विक्रीसाठी मंदिरात ठेवल्या आहेत, तर लाडूचा प्रसाद म्हणून शेंगदाणा, गूळ आणि बुंदीचे लाडूही बनवण्याचे काम सुरू आहे. द्वादशीच्या दिवशी करण्यात येणार्या रथोत्सवासाठी देवस्थानाने जुना लाकडी रथ सिद्ध ठेवला आहे. रथाचे पॉलिशिंग आणि त्यावर आकर्षक विद्युत् रोषणाईचे काम चालू आहे.