संपादकीय : ‘प्रदूषणमुक्त भारत’ हवा ! 

देहलीतील वायूप्रदूष

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना आला आणि देहलीतील प्रदूषणाविषयीची चर्चा झाली नाही, तरच नवल ! प्रतिवर्षी हे नित्यनेमाने घडते. यंदाही देहलीतील वायूप्रदूषणाने धोक्याची पातळीही अधिक प्रमाणात ओलांडली आहे. २० नोव्हेंबरला देहलीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ च्या वर गेला होता. खरेतर तो २०० च्या वर गेल्यास तीच पातळी धोकादायक म्हणून गणली जाते. देहलीचा हा निर्देशांक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे देहली हे सध्याच्या स्थितीला ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर’ म्हणून गणले जात आहे. ही स्थिती देशाच्या राजधानीसाठी लाजिरवाणी आहे. राजधानीच जर प्रदूषित होत असेल, तर उर्वरित राज्यांचा विचारच न केलेला बरा ! देहलीमुळे संपूर्ण भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलिन होत आहे, याचा केंद्र सरकारने विचार करावा. जगातील पहिल्या १० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील ८ शहरांचा समावेश आहे. देहलीतील प्रदूषणकारी विषारी हवेमुळे डोळ्यांना खाज सुटणे, डोळे जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, या समस्यांनी देहलीकर जनता त्रस्त आहे. देहलीतील प्रदूषणाची तुलना करायची म्हटली, तर प्रतिदिन ३६ सिगारेट ओढण्यासमान ती आहे. थोडक्यात ‘देहलीकर प्रतिदिन ३६ सिगारेट रिचवत आहेत’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. प्रदूषणाची वाढती तीव्रता पहाता इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग ‘ऑनलाईन’ स्तरावर घेण्याचे आदेश मुख्यमंत्री आतिशी यांनी शिक्षण संस्थांना दिले आहेत, तसेच सर्व शाळा बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रतिवर्षीच्या या प्रदूषणाच्या स्थितीची विद्यार्थ्यांनाही आता सवय झाली आहे. विदेशातून भारतात येतांना देहली विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांना विमानाच्या खिडकीतून दिसणारे प्रदूषण पाहून प्रश्न पडत आहे की, ही नक्की भारताची राजधानीच आहे ना ? येथे आपण जिवंत राहू शकू ना ? प्रदूषणामुळे विमान प्रवासावरही मोठा परिणाम झाला आहे. ‘लोकल सर्कल’ संस्थेच्या सर्वेक्षणातून लक्षात आले की, सध्या देहलीत ६९ टक्के कुटुंबांना प्रदूषणामुळे विविध आरोग्य समस्या भेडसावत आहेत. देहलीमध्ये अशी दुर्दैवी वेळ ओढावणे हे धक्कादायक आणि भविष्याच्या दृष्टीनेही विचार करण्यास उद्युक्त करणारे आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल २२ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने देहलीसह राजधानी क्षेत्रातील राज्यांना दिले. या प्रकरणी २२ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होईल.

वाढत्या प्रदूषणाची कारणे

देहलीत प्रदूषण का वाढत आहे ? याचा शोध घ्यायचा म्हटला, तर प्रतिदिन पालटणारी जीवनशैली हेच प्रामुख्याने कारण आहे. प्रत्येकाकडे महागड्या चारचाकी गाड्या आहेत. रस्त्यांवर माणसांपेक्षा गाड्यांचीच संख्या सर्वाधिक आढळून येते. वाहनांच्या माध्यमातून होणारे उत्सर्जन प्रदूषणास ४० टक्के कारणीभूत ठरत आहे. वाहनांद्वारे नायट्रोजन ऑक्साईड, पार्टिक्युलेट मॅटर आणि कार्बन मोनोऑक्साइड आदी प्रदूषकांचे उत्सर्जन होते. येथील रस्त्यांवर झाडेही नाहीत, म्हणजे मानवानेच विकासाच्या नावाखाली झाडे तोडली आणि घरात आणली, ती शोभेची किंवा प्लास्टिकची झाडे ! त्यातून ना ऑक्सिजन मिळते ना सावली ! जेथे निसर्गच नष्ट झाला आहे, तेथे शुद्ध हवा आणि ऑक्सिजन तरी कुठून मिळणार ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. देहलीत कधीही दिवाळी असते; म्हणजे कोणत्याही प्रसंगी फटाके वाजवण्याचे ‘फॅड’ येथे वाढले आहे. त्यातून प्रदूषणाला पुष्टी मिळते. मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामेही प्रदूषणाला उत्तरदायी आहेत. देहलीसह गाझियाबाद, नोएडा आणि फरिदाबाद येथे जीवाश्म इंधनातून सल्फर डायऑक्साइड (SO2) सारखे प्रदूषक (प्रदूषणकारी वायू) बाहेर सोडले जातात. हाच सल्फर डायऑक्साइड अतिविषारी असून तो डोळे, घसा आणि श्वसननलिका यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअर’ (CREA) या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार आढळून आले आहे की, देहलीतील ‘थर्मल पॉवर प्लांट’ १६ पट अधिक वायू प्रदूषक उत्सर्जित करत आहेत. भाताचा पेंढा जाळल्यास त्यातून १७.८ किलो टन प्रदूषकांचे उत्सर्जन होते; पण थर्मल पॉवर प्लांटद्वारे पेंढ्यापेक्षा १६ पट अधिक प्रदूषकांचे उत्सर्जन होते. हे अधिकच चिंताजनक आहे. बर्‍याचदा शेतात भाताचा पेंढा जाळण्याला सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो; पण सर्वाधिक उत्सर्जन करणार्‍या थर्मल पॉवर प्लांटकडे मात्र कानाडोळा केला जातो, हे गंभीर आहे. भाताचा पेंढा तर केवळ देहलीच नव्हे, तर अन्य राज्यांतही जाळला जातो; मात्र त्यातून तेथे प्रदूषण झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे केवळ पेंढ्याच्या सूत्रावर बोट ठेवणे किंवा त्यालाच दोष देणे अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार्‍या शेतीवरच एकप्रकारे आरोप करण्यासारखे आहे. देहलीच्या परिसरात ३०० कि.मी.पर्यंत पुष्कळ औष्णिक वीज प्रकल्प आहेत. तेथे कोळसा जाळून वीजनिर्मिती होते. त्यात कोळशाची राख आणि धूर असतो. त्यातून उत्सर्जित होणार्‍या घटकांमुळेही देहली शहर काळवंडत आहे.

थर्मल पॉवर प्लांट

या सर्वांमुळे देहलीतील हवा प्रदूषणकारीपेक्षा विषारी होत चालली आहे. हे विषच जणू नागरिक प्रतिदिन प्राशन करत आहेत आणि प्रत्येक देहलीकर प्रतिदिन मरत आहे. याकडे आता डोळेझाक करून चालणार नाही. आज शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली. काही दिवसांनी नागरिकांना घराबाहेर पडणेच अशक्यप्राय होऊन बसेल. त्यामुळे या समस्येचा गांभीर्याने विचार करायला हवा; पण याचे गांभीर्य कुणाला आहे ? देशात अन्य प्रदूषणांपेक्षा राजकीय प्रदूषणच दिवसेंदिवस वाढत आहे. महिला अत्याचार, जिहाद, भ्रष्टाचार, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन यांसह वैचारिक प्रदूषाचे प्रमाण अधिक असल्याने प्रदूषित हवेकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला ?

भारताने कलंक मिटवावा ! 

देहलीची सद्य:स्थिती पहाता देहली विनाशाच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचेच चित्र दिसते. यातून आता देहलीकरांची सुटका नाही. मुंबईचीही स्थिती काही चांगली नाही. मुंबई शहरही प्रदूषणाचा उच्चांक गाठत आहे. आज देहली जात्यात आहे, तर मुंबई सुपात आहे. अन्य शहरेही त्यामागोमाग आहेतच. प्रदूषण म्हणजे आता समस्या न रहाता आता त्या भस्मासुराचा देशाला बसणारा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. यावर उपाययोजना काढणे हे सरकार, प्रशासन आणि नागरिक यांचे कर्तव्य आहे. त्यासह प्रदूषण करणार्‍या यंत्रणा, आस्थापने यांच्यावर तात्काळ बंदी आणायला हवी. विकासाची सर्वाेच्च पायरी गाठणे, अर्थव्यवस्थेत वरचढ ठरणे यासाठी प्रयत्नशील असणार्‍या भारताने प्रदूषणाच्या एका सूत्रावर जगभरात कलंकित होणे आता थांबवावे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवून ‘प्रदूषणमुक्त भारत’ साकारावा, ही नागरिकांची अपेक्षा !

विषारी घटकांचे उत्सर्जन करणारे देहलीतील थर्मल पॉवर प्लांट आणि औष्णिक वीज प्रकल्प यांच्यावर सरकार नियंत्रण आणेल का ?