कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुपा प्रसार करण्याचा प्रयत्न !
हिंदुत्वनिष्ठांनी जाब विचारल्यानंतर प्रार्थना न घेण्याची शाळेची भूमिका !
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील जाधववाडी परिसरात असणार्या महापालिकेच्या एका शाळेत गेल्या काही दिवसांपासून हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुप्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होता. ही प्रार्थना शाळेत विद्यार्थ्यांकडून म्हणून घेण्यात येत होती. या गाण्यात ‘तू डर मत बंदे, मुश्कीलोसे कहेना-मेरा खुदा बडा है’, अशा आशयाचे बोल होते. हे लक्षात आल्यानंतर या संदर्भात २१ नोव्हेंबरला संतप्त पालक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावर मुख्याध्यापकांनी ‘ही प्रार्थना अगोदरपासून चालू असून काहींचा आक्षेप असल्याने यापुढे ती शाळेत घेणार नाही’, असे लेखी पत्र दिले. पालकांचा रोष इतका होता की, पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
शाळेत चालतात अनेक धक्कादायक प्रकार !
या संदर्भात हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘या शाळेत अनेक धक्कादायक प्रकार होत असल्याच्या तक्रारी पालकांनी आमच्याकडे केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेत दोन विद्यार्थ्यांचे भांडण झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना शौचालय स्वच्छ करायला लावणे, विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्र असलेला वेश परिधान करून आल्यावर एकाला तो सर्वांसमोर काढायला लावणे आणि त्याला कपडे काढून सर्वांसमोर उघडे करणे, शनिवारी मुलींना ‘स्कर्ट’ घालण्याची बळजोरी करणे यांसह अन्य तक्रारी शाळेच्या संदर्भात आहेत. आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना वरील प्रार्थनेविषयी जाब विचारल्यावर ‘आम्हाला ही प्रार्थना प्रशिक्षणाच्या कालावधीत शिकवण्यात येत होती’, असे लेखी लिहून दिले आहे. या संदर्भात आम्ही शिक्षणाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करून अशा ‘संबंधित शिक्षकांना बडतर्फ करावे’, अशी मागणी करणार आहोत.’’
विद्यार्थिनींना टिकली, तर विद्यार्थ्यांना अष्टगंध लावण्यास मनाई !
या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या काळात याचे राजकारण नको; म्हणून आम्ही शांत होतो; मात्र आज आम्ही शाळेच्या व्यवस्थापनाला याचा जाब विचारला आहे. शाळेत विद्यार्थिनींना टिकली लावण्यास मनाई केली जाते, तर मुलांना अष्टगंध लावू दिले जात नाही. हे धक्कादायक आहे.’’
हिंदुत्वनिष्ठ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित !
या वेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. स्वप्नील कोडग, श्री. ओंकार रजपूत यांच्यासह ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे ही प्रार्थना घेणार नाही ! – शाळा प्रशासनया संदर्भात शाळेच्या प्रशासनाने ‘गेल्या ८ वर्षांपासून ही प्रार्थना शाळेत होत आहे. यावर आता पालकांनी आक्षेप घेतल्याने ती यापुढे घेण्यात येणार नाही’, असे सांगितले. |
संपादकीय भूमिकाखरे तर अशा अपप्रकारांकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. हिंदुत्वनिष्ठांनी जर हे उघड केले नसते, तर हा प्रकार चालूच राहिला असता. त्यामुळे प्रशासनातील संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे ! |