हिंदूंना आता कुणी छेडले, तर ते सोडणार नाहीत ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या १६० कि.मी. चालणार्या हिंदु जागृती यात्रेला प्रारंभ
छत्तरपूर (मध्यप्रदेश) – येथील सहस्रो लोकांची गर्दी तुम्हाला काय सांगत आहे? बागेश्वरमधील हे जागृत हिंदू वर्ष २०२४ चे जागृत हिंदू आहेत. ‘जे थप्पड मारल्यावर पळून जात होते’, असे हिंदू ते राहिलेले नाहीत. हे तेच हिंदू आहेत ज्यांना तुम्ही छेडले, तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. हे हिंदू अहिंसक आहेत, हिंसक नाहीत; कारण त्यांच्या हातात तलवार नाही; मात्र त्यांच्याकडे विचारांची तलवार आहे, असे विधान येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले आहे. २१ नोव्हेंबरपासून त्यांनी छत्तरपूर ते ओरछा अशी १६० कि.मी. अंतराची हिंदु जागृती यात्रा प्रारंभ चालू केली आहे. त्या वेळी ते बोलत होते.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की,
१. आम्हाला या हिंदूंच्या हातात सत्याचे पुस्तक ठेवायचे आहे. या हिंदूंच्या हातात रामायण आणि श्रीमद़्भगवद़्गीता द्यायची आहे. आम्हाला या हिंदूंच्या हातात तर्कशुद्ध विचार ठेवायचे आहेत. या हिंदूंच्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार आम्हाला द्यायचा आहे. आम्हाला हिंदूंच्या हक्कांबद्दल बोलायचे आहे, राज्यघटनेबद्दल बोलायचे आहे, देशाच्या एकतेबद्दल बोलायचे आहे.
२. भारत गंभीर संकटात आहे. त्यामुळे ‘करा किंवा मरा’, अशी स्थिती निर्माण झाली आहे, असे तुम्ही म्हणता. आपल्या देशात राहून आपल्या मंदिरांवर इतरांनी मिळवलेल्या नियंत्रणापेक्षा मोठे संकट काय असू शकते ? ते (हिंदुद्वेष्टे) रामाच्या राज्यात राहून उदरनिर्वाह करतात; पण तरीही रामाच्या अस्तित्वाचा पुरावा मागतात. बाबर आणि अकबर यांच्या काळात या लोकांनी (धर्मांधांनी) काशी विश्वनाथ मंदिराला मशीद म्हणून घोषित केले. जिथे भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले, तिथे एक मशीद बांधली गेली. त्यांनी अनेक ठिकाणी देशावर त्यांचा हक्क सांगितला. ते हिंदु समाजाला सांगत आहेत की, आता आपल्यावर ‘करा किंवा मरा’, अशी वेळ आली आहे. उद्या बागेश्वर धाममध्ये त्यांनी (धर्मांधांनी) थगडे बांधले, तर आपण नक्कीच मरणार आहोत. म्हणूनच हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आणि जातीवाद दूर करण्यासाठी आम्ही हे (हिंदूंना संघटित) करत आहोत.
३. हिंदूंनी संघटित व्हावे. आम्ही ज्या ठिकाणी पोचत नाही, तेथे हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार वाढत आहेत. धार्मिक नेत्यांना गरिबांपर्यंत पोचावे लागेल. आदिवासी नाही, आम्ही या समाजाला ‘अनादिवासी’ असे नाव देत आहोत. हा समाज भगवान रामाच्या काळापासूनचा आहे. आपण त्यांचा आदर केला पाहिजे.
४. आमचा पक्ष बजरंगबलीचा पक्ष आहे, त्यांचे चिन्ह गदा आहे. आम्ही कोणताही पक्ष काढत नाही. आम्हाला राजकारणात जायचे नाही. राजकारणात जाऊन काय करणार? मी माझे आयुष्य हिंदूंसाठी जगेन आणि हिंदूंसाठीच मरेन, अशी शपथ हनुमानजींच्या चरणी घेतली.
मंदिर आणि मशीद येथे ‘वन्दे मातरम्’ गायल्यास कोण देशभक्त आहे, हे स्पष्ट होईल !
मंदिर असो किंवा मशीद असो, दोन्ही धर्मस्थळांवर ‘वन्दे मातरम्’ म्हटले गेले पाहिजे. जर हा नियम लागू केला, तर देशभक्त कोण आहे आणि राष्ट्रविरोधी कोण? ही गोष्ट स्पष्ट होईल, असे विधान पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वेळी केले.
ते पुढे म्हणाले की, सगळ्या समुदायांना देशात समान स्थान आहे, तसेच त्यांचा योग्य सन्मान केला जातो; मात्र वन्दे मातरम् म्हणण्याची प्रथा चालू करण्यात आली की, लोकांमध्ये देशभक्ती आपोआपच रूजली जाईल. अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला, तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने उचलण्यात आलेले ते पाऊल असेल. लोकांमधल्या धार्मिक बाधा दूर होतील आणि एकमेकांमध्ये बंधूभाव वाढेल.