नवी मुंबईत निवडणुकीच्या कालावधीत अनधिकृत बांधकामांत वाढ !
पायाभूत सुविधांवर परिणाम
नवी मुंबई, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – शासकीय यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम पायाभूत सुविधांवर होत आहे.
१. आचारसंहिता लागल्यापासून सर्व शासकीय विभागातील सहस्रो कर्मचारी आणि अधिकारी यांना निवडणुकीशी संबंधित कामे दिली होती. परिणामी शहरातील दैनंदिन सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली. याचा अपलाभ घेत शहरातील मूळ गावठाण, एम्.आय.डी.सी.तील झोपडपट्टी आणि सिडको नोड येथील रहिवाशांनी, तसेच भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे चालू केली आहेत.
२. गावठाणातील चाळी आणि जुन्या इमारती तोडून ५ ते ६ माळ्याच्या इमारतींची बांधकामे चालू झाली आहेत. या बांधकामांच्या संदर्भात एम्.आय.डी.सी., सिडको आणि महापालिका अधिकार्यांना सर्व माहिती आहे; पण निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. या बांधकामांसाठी चोरीने पिण्याचे पाणी वापरले जात आहे.
३. ही बांधकामे पूर्ण होऊन रहिवाशी संख्येत वाढ झाल्यास पिण्याचे पाणी, पार्किंग, रस्ते, पदपथ, मलनि:स्सारण वाहिन्या या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण येईल. त्यामुळे वेळीच कारवाई करून ही कामे थांबवणे आवश्यक असल्याचे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.