Adani Group : कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकार्यांना दिली २ सहस्र कोटी रुपयांची लाच !
|
न्यूयॉर्क (अमेरिका) – भारतातील अदाणी उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर २ सहस्र कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप न्यूयॉर्क येथील विधी विभागाच्या सरकारी अधिवक्त्यांनी केला आहे. या अधिवक्त्यांनी आरोप केला की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर ७ जणांनी सौर ऊर्जा वितरित करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील काही सरकारी अधिकार्यांना २ सहस्र २९ कोटी रुपयांची लाच देऊ केली. गेल्या वर्षी अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेनेही अदाणी समुहावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्या वेळी अदाणी समुहाने हे आरोप तात्काळ फेटाळून लावले होते. गौतम अदाणी, विनीत जैन, रंजीत गुप्ता, रूपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. येथे गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
या सरकारी अधिवक्त्यांनी असाही आरोप केला की, ‘अदाणी ग्रीन एनर्जी’मधील माजी कार्यकारी विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून ठेवला आणि ३ अब्ज डॉलरपेक्षा (२५ सहस्र ३४८ कोटी रुपयांपेक्षा) अधिक कर्ज अन् रोखे (बाँड) गोळा केले.
सर्व आरोप निराधार ! – अदाणी समूहअमेरिकेच्या विधी विभागातील अधिवक्त्यांच्या आरोपांवर अदाणी समुहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदाणी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते फेटाळत आहोत. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये नोंदवण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत केवळ आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करत आहोत. अदाणी समूह कायमच व्यवस्थापनाच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करत आला आहे. कारभारात पारदर्शकता आणि आस्थापनाच्या सर्वच विभागात नियमांचे पालन, या गोष्टी अदाणी समुहासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही आमच्या भागधारकांना, भागीदारांना आणि कर्मचार्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की, अदाणी समूह कायद्याचे पालन करणारा समूह असून सर्व कायद्यांचा आदर राखतो. |
अदाणी यांच्या शेअरचे भाव कोसळल्याने २ लाख कोटी रुपयांची हानी !
गौतम अदाणी यांच्यावर झालेल्या आरोपांचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. यासह अदाणी समुहाच्या शेअरमध्ये जवळपास २० टक्क्यांची घसरण झाली. यामुळे अदाणी समुहाचे बाजारमूल्य २ लाख कोटी रुपयांनी घटले. जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्गच्या आरोपानंतरही अदाणी यांचे शेअर घसरल्याने त्यांची हानी झाली होती.
संपादकीय भूमिकाअशा सतत करण्यात येणार्या आरोपांद्वारे भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याचाही शोध भारताने घेणे आवश्यक आहे ! |