‘द साबरमती रिपोर्ट’ हिंदी चित्रपट : हिंदुविरोधाचे सत्य मांडणारा नवा दुवा !
महत्त्वपूर्ण आशय देणारा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा हिंदी चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटात वर्ष २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाचे अंगावर काटा आणणारे वास्तव अतिशय स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. तथाकथित मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचा चेहराही या निमित्ताने पूर्णपणे उघड झाला आहे.
१. देशाच्या राजकारणास आणि समाजकारणास कलाटणी देणारा चित्रपट
देशात वर्ष २०१४ नंतर ‘गोदी मिडिया’ (पंतप्रधान मोदी यांच्यासाठी कार्यरत माध्यमे), ‘भक्त’ असे शब्द जाणीवपूर्वक शिवीप्रमाणे वापरून वर्ष २०१४ पूर्वीची स्वतःची पापे झाकणार्या अनेकांच्या चेहर्यावरचे डागही ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाने दाखवून दिले आहेत. आताही देशातील स्थिती लक्षात घेता ‘गोध्रा हत्याकांडा’सारखा देशाच्या राजकारणास आणि समाजकारणास कलाटणी देणारा विषय मांडण्याचे निर्माता, दिग्दर्शक अन् अभिनेते यांचे धैर्यही वाखाणण्याजोगे ठरले आहे. या चित्रपटाचे सर्वांत मोठे बलस्थान, म्हणजे त्यातील प्रत्येक शब्द आणि घटना त्या काळातील ठोस कागदपत्रांच्या आधारे चित्रित करण्यात आली आहे. अर्थात या घटनेचे सत्यच एवढे भेदक आहे की, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भर मुद्दामहून घालण्याची आवश्यकताच नाही.
२. चित्रपटात दाखवण्यात आलेले वास्तव चित्रण
‘गोध्रा हत्याकांड’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे, ‘गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकामध्ये २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एका बोगीला आग लावण्यात आली होती आणि त्यामध्ये असलेल्या ५९ कारसेवकांना जीव गमवावा लागला होता; मात्र हा घातपात नसून अपघात असल्याची परिस्थिती त्या वेळी निर्माण करण्यात आली होती.’ चित्रपटाचा प्रारंभ याच घटनेतून होतो.
ही घटना अगदी ‘ग्राऊंड झिरो’वर (प्रत्यक्ष घटनास्थळी) जाऊन तेव्हाच्या मानिका राजपुरोहित नामक (अभिनेत्री रिद्धी डोग्रा यांनी साकारलेले पात्र) प्रसिद्ध इंग्रजी भाषिक पत्रकारासह ‘कॅमेरामॅन’ (छायाचित्रकार) म्हणून गेलेल्या समरने (अभिनेते विक्रांत मेस्सी यांनी साकारलेले पात्र) बघितलेली असते; मात्र प्रत्यक्षात अपघात असल्याचे सोडून ‘हा केवळ घातपात असून गुजरातचे तत्कालीन राज्य सरकार यासाठी उत्तरदायी आहे’, असे वार्तांकन देशाच्या माथी मारले जाते. हे पाहून समरमधील हाडाचा पत्रकार अस्वस्थ होतो. अगदी भाबडेपणाने समर त्याच्या वृत्तवाहिनीच्या मालकांशी सत्य दाखवण्यासाठी तात्त्विक वादही घालतो; मात्र पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदु समाजाला लक्ष्य घेण्याची सुपारी घेतलेल्या ‘ईबीटी न्यूज’ या वृत्तवाहिनीचे मुखंड (मालक) समरला धुडकावून लावतात आणि त्याला शब्दश: आयुष्यातून उठवतात.
कालांतराने अमृता नामक (अभिनेत्री राशी खन्ना यांनी साकारलेले पात्र) एक प्रशिक्षण घेणारी पत्रकार अगदी वरवर ‘गोध्रा हत्याकांड’ विषयाचा अभ्यास करण्यास प्रारंभ करते; मात्र तिला या प्रकरणामध्ये सत्य दडपले गेल्याचा संशय येतो. त्यानंतर समरच्या साथीने ती पुन्हा या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सत्य शोधते. हा सर्व प्रवास वर्ष २००२ ते २०१७ आणि वर्ष २०१७ ते २२ जानेवारी २०२४, म्हणजेच अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरात झालेली श्रीरामलल्लाची (प्रभु श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा एवढ्या मोठ्या काळात होतो. या मधल्या कालावधीत देशातील पालटलेले राजकारण सविस्तर दिसते.
सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे हिंदु समाज आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री अन् आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचे ‘इकोसिस्टम’चे (यंत्रणेचे) प्रयत्न, तसेच त्यामध्ये असलेला माध्यमसमूहांचा सक्रीय सहभाग, असा पट उलगडून दाखवण्यात दिग्दर्शकास चांगले यश आले आहे. चित्रपट मध्यंतरापर्यंत अतिशय वेगवान असून दर्शकांची चांगलीच पकड घेतो. मध्यंतराच्या नंतर मात्र चित्रपट काहीसा रेंगाळतो. मध्यंतरानंतर ‘गोध्रा प्रकरणा’तील आणखी पैलू मांडण्याचा वाव होता; मात्र चित्रपटाचा मुख्य विषय ‘प्रसारमाध्यमांचे कारनामे’ दाखवण्यापुरताच मर्यादित ठेवल्याने कदाचित् अन्य पैलू मांडले नसावेत. आजच्या पिढीला कदाचित् ही घटना ठाऊक नसावी, त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी ‘डॉक्युमेंटेशन’ (लेखी कागदपत्रे) ठरणार आहे.
३. ‘गोध्रा हत्याकांडा’मागचे षड्यंत्र आणि त्याचे परदेशी धागेदोरे यांवर चित्रपटातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न
चित्रपटामध्ये माध्यमसमूहांची कार्यशैली अतिशय स्पष्टपणे दाखवली आहे. ‘गोध्रा हत्याकांडा’चे एकांगी आणि प्रामुख्याने हिंदुविरोधी वार्तांकन करणारा माध्यमसमूह वर्ष २००२ मध्ये पुढे गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी कसे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मुख्यमंत्री त्या समूहास कशी जागा दाखवून देतात, हा प्रसंग चित्रपटात विशेष ठरतो. त्याचप्रमाणे ‘गोध्रा हत्याकांडा’मध्ये मुसलमानांनाच पीडित ठरवून त्यांचा वापर करणार्या स्वयंसेवी संस्थांवरही चित्रपटाने प्रकाश टाकला आहे. चित्रपटामध्ये तत्कालीन राजकीय संदर्भही चपखलपणे दाखवले आहेत. वाजपेयी सरकार, तत्कालीन मोदींचे राज्य सरकार, वर्ष २००४ नंतर केंद्रातील काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार यांची भूमिका होती तशी दाखविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘गोध्रा हत्याकांडा’मागचे षड्यंत्र आणि त्याचे परदेशी धागेदोरे यांवरही भाष्य करण्यात आले आहे. या सर्व घटनांना साजेसे संगीतही देण्यात आले आहे.
४. ‘हिंदूहिताचे’ आणि ‘राष्ट्रहिताचे’ चित्रपट षड्यंत्र उघड करण्यासाठी महत्त्वाचे !
धीरज सरना यांचे चित्रपट दिग्दर्शन अप्रतिम आहे. विशेष म्हणजे त्यांनी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चित्रपट करण्याचे धाडस दाखवले आहे. चित्रपटास विनाकारण ‘सेक्युलर’ (निधर्मी) तडका न देता त्यांनी २ घंट्यांच्या अवधीत सत्य दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून तो यशस्वी झाला आहे. एकता कपूर यांनी ‘गोध्रा हत्याकांडा’सारख्या अतिशय ज्वलंत विषयाची निवड करणे हेही विशेष.
एकूणच देशात सध्या ‘हिंदूहिताचे’ आणि ‘राष्ट्रहिताचे’ विषय जसे घडले, तसेच चित्रपटात मांडण्याचे नवे पर्व चालू झाले आहे. ‘बुद्धा इन ट्रॅफिक जाम’, ‘उरी’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’, ‘बस्तर – द नक्सल स्टोरी’ आणि ‘आर्टिकल ३७०’ हे हिंदी चित्रपट या मालिकेत येतात. आता याच मालिकेत ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. हिंदूंसाठी असे चित्रपट अतिशय महत्त्वाचे ठरतात; कारण हिंदूंच्या विरोधात कशा प्रकारचे षड्यंत्र करण्यात आले होते आणि भविष्यातही काय होऊ शकते, हे सातत्याने जाणून घेण्यासाठी असे चित्रपट सिद्ध होणे महत्त्वाचेच !
– पार्थ कपोले
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १६.११.२०२४)
संपादकीय भूमिका :हिंदूंच्या विरोधात कशा प्रकारचे षड्यंत्र करण्यात आले होते अन् भविष्यात काय होऊ शकते, हे चित्रपटांमधून उघड व्हायला हवे ! |