गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील कु. साधना सूर्यकांत सावंत (वय २४ वर्षे) !

‘कार्तिक कृष्ण सप्तमी (२२.११.२०२४) या दिवशी फोंडा, गोवा येथील आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या कु. साधना सावंत हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. साधना सावंत

कु. साधना सावंत हिला २४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. कु. साधनाने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर रामनाथी आश्रमात साधना आणि सेवा करणे अन् ती सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणांशी आल्याने तिचे जीवन कृतार्थ होणे

‘साधनाची  बारावीची परीक्षा झाल्यावर ती १५ दिवस रामनाथी आश्रमात रहायला गेली होती. तेव्हा तिला साधक, आश्रमजीवन आणि आश्रमातील कार्यपद्धती सर्वकाही आवडले. नंतर आम्ही तिला पूर्णवेळ साधना करण्याविषयी विचारले. तेव्हा तिने लगेच पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.

आम्ही पुणे येथून गोवा येथे रहायला आलो. तेव्हा तिच्यासाठी आश्रमजीवन नवीनच होते; पण तिने कधीच त्याविषयी गार्‍हाणे केले नाही. तिचे शिक्षण थांबून ती आश्रमात सेवा करू लागल्यावर आम्हाला ‘तिचे जीवन वाया गेले’, असे कधीही वाटले नाही. ती सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांशी आल्यामुळे आम्ही कृतार्थ झालो आहोत. देवाने आम्हाला फुलासारखे ठेवले आहे. ‘आश्रमातील सर्व साधक, संत आणि सद्गुरु आम्हाला प्रेम देतात’, याबद्दल आम्हाला कृतज्ञता वाटते.

२. पू. संदीप आळशी यांनी साधनाला प्रसादाच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी चैतन्य देणे

सौ. सुजाता सावंत

साधना कलेशी संबंधित सेवा शिकू लागली. ती आठवड्यातून एकदा पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत, वय ४९ वर्षे) यांना सकाळी अल्पाहार देण्याची सेवा करत असे. पू. संदीपदादा तिला ‘सेवेत काही अडचण आहे का ?’, असे विचारायचे आणि तिला साधनेचे दृष्टीकोन अन् दिशा द्यायचे. ते साधनाचे कौतुक करायचे आणि तिला प्रसादही द्यायचे. जणूकाही ‘पू. संदीपदादा साधनाला सेवा करण्यासाठी चैतन्य देत होते’, असे मला वाटते.

३. सेवाभाव

३ अ. गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून सेवा करणे : तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांच्या मालिकेतील ग्रंथांसंबंधी सेवा करायला सांगितली. ती ही सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करत असे. ती सेवा करतांना गुरुदेवांच्या अनुसंधानात असते. ती सेवेशी एकरूप होते. त्यामुळे ती करत असलेली चित्रांसंबंधी सेवा कोणताही अडथळा न येता वेळेत पूर्ण होते.

३ आ. दायित्व घेऊन आणि चुकांविरहित सेवा करणे : ती कलेशी संबंधित सेवा दायित्व घेऊन करते. त्या वेळी ती न घाबरता आणि ताण न घेता ही सेवा सहजतेने पूर्ण करते. तिची उत्तरदायी साधिका कधी कधी घरी जाते. तेव्हा ती साधनाला सेवांचे दायित्व देते. त्या वेळी ‘साधना पुष्कळ अनुभव असल्यासारखी कशी सेवा करते ?’, याचे मला आश्चर्यच वाटत असे. मी साधनाला विचारले, ‘तुला पुष्कळ सेवा असतात का ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘प्रत्येक सेवेत अनेक बारकावे असतात.’’ ती सहसाधकांमध्ये वयाने सर्वांत लहान आहे. ती सेवा मनापासून आणि चुकांविरहित करते. सहसाधक तिच्याशी प्रेमाने बोलतात. साधना प्रत्येक निर्णय उत्तरदायी साधिकेला विचारूनच घेते.

३ इ. परिपूर्ण सेवा करणे : साधना ‘ती करत असलेली कलेशी संबंधित सेवा किंवा आश्रमातील अन्य सेवा परिपूर्ण झाली आहे ना !’, याची निश्चिती करते. तिचा ‘आपल्या सेवेचा कुणाला पाठपुरावा करावा लागू नये आणि त्यांचा सेवेतील वेळ वाया जाऊ नये’, असा विचार असतो.

४. आईला साधनेत साहाय्य करणे

अ. मी काही अयोग्य बोलल्यास किंवा माझ्याकडून आश्रमातील एखाद्या सूत्राचे पालन झाले नाही, तर साधना मला तत्त्वनिष्ठपणे त्याची जाणीव करून देते.

आ. ती मला अंतर्मुख रहाण्यासाठी साहाय्य करते.

इ. ती माझी आध्यात्मिक मैत्रीण झाली आहे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

साधना तिची बारावीची परीक्षा झाल्यावर लगेच आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागल्यामुळे तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते. एकदा आम्हाला लाभलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधनाने त्यांना सांगितले, ‘‘आम्ही व्यवहारात (मायेत) राहिलो असतो, तर आमचे कसे झाले असते ?’, याचा आम्ही विचारच करू शकत नाही.’’ गुरुदेवांना हे सांगत असतांना साधनाची पुष्कळ भावजागृती झाली. तेव्हा गुरुदेवांनी तिचे कौतुक केले आणि सांगितले, ‘‘असे विचार कुणाचेच नसतात.’’ गुरुदेवांनी तिला खाऊ दिला.

तिच्या मनात केवळ ‘परात्पर गुरु डॉक्टरांना डोळे भरून पहायचे आहे, त्यांना मनात साठवायचे आहे’, एवढाच विचार असतो. ‘देवाशी काय बोलणार ? देवाने सर्वच दिले आहे’, असे वाटून ती सतत कृतज्ञताभावात असते.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, ‘तुम्ही साधनावर संस्कार करत आहात. तिला सेवा करण्यासाठी शक्ती आणि चैतन्य देत आहात’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. सुजाता सूर्यकांत सावंत (कु. साधनाची आई), फोंडा, गोवा. (१७.२.२०२४)