Alexander Dugin On India : भारताने त्‍याची महान हिंदु संस्‍कृती पुनर्स्‍थापित करावी ! – अलेक्‍झांडर डुगिन,  पुतिन यांचे राजकीय गुरु

पुतिन यांचे राजकीय गुरु अलेक्‍झांडर डुगिन

मॉस्‍को – रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांचे राजकीय गुरु अलेक्‍झांडर डुगिन यांनी भारताला त्‍याच्‍या महान हिंदु संस्‍कृतीची पुनर्स्‍थापना करण्‍याचे आवाहन केले आहे. रशियाच्‍या सरकारी प्रसारमाध्‍यमांशी बोलतांना रशियन राजकीय शास्‍त्रज्ञ आणि तत्‍वज्ञानी डुगिन म्‍हणाले की, वैदिक संस्‍कृतीची संकल्‍पना सर्वसमावेशक आहे आणि ती पुनर्स्‍थापित केल्‍यामुळे बहुध्रुवीय जगाची स्‍थापना करण्‍यास साहाय्‍य होईल. रशियाने अमेरिकेच्‍या विरोधातील विकेंद्रित व्‍यवस्‍थेला सातत्‍याने पाठिंबा दिला आहे. यामुळे अमेरिकेच्‍या वर्चस्‍वाला धोका निर्माण झाला आहे.

डुगिन यांनी अखंड भारताविषयीही केले आहे भाष्‍य !

यावर्षी एप्रिलमध्‍ये दुगिन म्‍हणाले होते की, भारत आपल्‍या डोळ्‍यांसमोर एक नवीन जागतिक केंद्र म्‍हणून उदयाला येत आहे. भारतीय अर्थव्‍यवस्‍थेच्‍या वेगवान गतीविषयीही  त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखात आनंद व्‍यक्‍त केला. दुगिन यांनी लिहिले होते की, आज भारतीय वंशाचे लोक जगभरात मोठी भूमिका बजावत आहेत. भारताचा आर्थिक विकास, जागतिक प्रभाव, राजकीय पालट, सांस्‍कृतिक आणि वैचारिक पालट, वसाहतवाद आणि सार्वभौमत्‍व, भू-राजकीय धोरण यांची उदाहरणे देऊन त्‍यांनी भारताचे वाढते महत्त्व स्‍पष्‍ट  केले होते.

अलेक्‍झांडर डुगिन कोण आहेत?

अलेक्‍झांडर डुगिन यांचे पूर्ण नाव अलेक्‍झांडर गॅलिविच डुगिन आहे. रशियामध्‍ये ते एक राजकीय तत्‍वज्ञानी, विश्‍लेषक आणि रणनीतीकार म्‍हणून ओळखले जातात. पाश्‍चिमात्‍य देश ‘डुगिन हे फॅसिस्‍ट विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत’, असा आरोप करतात. पाश्‍चिमात्‍य देशांमध्‍ये अलेक्‍झांडर डुगिन हे रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांचे राजकीय गुरु मानले जातात.