वाढती संघटित गुन्हेगारी आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाची उपाययोजना !
माजी पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी नुकताच काही पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यात त्यांनी वाढती गुन्हेगारी आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाची उपाययोजना यांवर चर्चा केली. या वेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत. १९ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुंडांच्या टोळींचा विस्तार मर्यादेच्या बाहेर, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी समाजाचा सक्रीय सहभाग, गुन्हेगारीवरील नियंत्रणासाठी परराष्ट्रांचे साहाय्य, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणि खंडणीसाठी कुख्यात गुंडांचे दूरभाष आल्यावर काय करावे ?’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856230.html
१०. गंभीर गुन्ह्यांमध्ये युवकांचा वाढता सहभाग आणि त्यावर उपाययोजना
अतिशय गंभीर गुन्ह्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग ही चिंता करण्याची गोष्ट आहे. हा केवळ तरुणांवर होणारा परिणाम नव्हे, तर त्याचा समाजावर मोठा परिणाम होणार आहे, ही अधिक गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या देशात शांतता आणि स्थिरता हवी असल्यास आपल्याला आपल्या परिसरातील युवकांची काळजी घेतली पाहिजे. शाळेत न जाणारा किंवा त्याच्या वर्गांना उपस्थित न रहाणारा मुलगा दिसल्यास त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याला आर्थिक साहाय्य, प्रेम किंवा अन्य काही खेळासारख्या गोष्टी हव्या का ?, याची चौकशी करून त्या त्याला देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अशा युवकांना योग्य मार्गावर ठेवले पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात अडकत जाणार्या युवकांचे प्रमाण मुळात न्यून होईल.
एखादा विद्यार्थी पुष्कळ काळ शाळेत येत नसेल, तर त्याच्या घरी जाऊन त्याची समस्या जाणून घेतली पाहिजे. पहिली ते दहावी किंवा बारावीपर्यंत शिकणारी मुले नियमित शाळेत येतात का ?, याची शिक्षकांनी खात्री केली पाहिजे. या मुलांच्या ज्ञानात १० ते १२ वर्षे भर पडली पाहिजे आणि ते चुकीच्या मार्गाने जात नाहीत किंवा चुकीच्या संगतीत रहात नाहीत ना, याची खात्री केली पाहिजे. अलीकडेच ऑस्ट्रेलियामध्ये एक कायदा केला आहे. तेथे
१० वर्षांच्या मुलाला प्रौढाप्रमाणे वागणूक देण्यात येते आणि त्याच्यावर प्रौढ म्हणून कारवाई होते; कारण तेथे १० ते १२ वर्षांची मुले गंभीर गुन्हे करत आहेत. ही परिस्थिती इतर ठिकाणी आणि भारतात यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वाढत्या प्रमाणात सामाजिक नियमन झाले पाहिजे.
११. गुन्हेगारी न्यून करण्यात ‘पोलीस मित्र’ संकल्पनेचे यश
पूर्वीच्या काळात आपले परिचित किंवा शेजारी हे ‘आपले मूल व्यवस्थित वाढते आणि योग्य मार्गावर आहे ना ?’, याविषयी खात्री करत होते. जर तो अयोग्य करत असेल, तर ते त्याला शिक्षा करत होते किंवा त्याच्या पालकांना सांगत होते, तसेच तो मुलगा व्यवस्थित वागेल, याची खात्री करत होते. ‘मेट्रोपॉलिटन’ (महानगर) भाग आणि नवीन शहरे यांमुळे हे सामाजिक नियमन वाढत्या प्रमाणात ढासळत आहे. समाजात नेहमीच एकमेकांविषयी जवळचे संबंध आणि नाते असले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला प्रत्येकाविषयी माहिती असेल. अशा सामाजिक नियमनामुळेे व्यक्तीला एखाद्याच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवता येते. गुन्हेगार जेथे रहातात, तेथे ते गुन्हे करत नाहीत, तर दुसर्या ठिकाणी जाऊन गुन्हे करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना राबवली होती. तरुण, म्हातारे आणि महिला यांना त्यांच्या भागात कुणी अनोखळी व्यक्ती दिसली, तर ते त्याला विचारायचे. ‘तू कोण आहेस ?, येथे का आला ?, तुझे काय काम आहे ?’, असे प्रश्न त्याला विचारले जायचे. या गोष्टी ‘सीसीटीव्ही’हून अधिक परिणामकारक आहेत. ‘सीसीटीव्ही’ चांगला आहेच; परंतु मानवी बुद्धीमत्ता ही या साधनांपेक्षा अधिक विश्वासदायी आहे. त्यामुळे भारत सरकारने गंभीरपणे ‘पोलीस मित्र’ या संकल्पनेवर विचार करायला पाहिजे आणि ही संकल्पना सर्व भागात लागू केली पाहिजे. विशेषतः देहली, मुंबई, कोलकाता इत्यादी शहरांमध्ये लागू केली पाहिजे; कारण या शहरांमध्ये प्रतिदिन सहस्रो माणसे येत असतात. एका अभ्यासानुसार असे दिसून येते की, ग्रामीण भागातून शहरांत येणार्या १०० जणांपैकी अनुमाने ९५ टक्के लोकांना तेथे टिकून रहाण्यासाठी योग्य कौशल्य नसते, त्यांना रहायला जागा नसते, त्यांना काही काम नसते आणि पैसे मिळवण्याचे साधन नसते. त्यामुळे ते समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होण्याची शक्यता अधिक असते. कायद्याच्या कार्यवाहीमध्ये लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. याविषयी काळजी घेतली पाहिजे, अशी माझी भारत सरकार आणि विविध राज्यांतील सरकारे यांना विनंती आहे.
(समाप्त)
– श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.