साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना ‘सौ. सुप्रिया माथूर यांच्यात कोणते पालट जाणवतात ?’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात झालेले संभाषण
६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजीत माथूर साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकांना ‘सुप्रियाताईंमध्ये कोणते पालट जाणवत आहेत ?’, याविषयी झालेल्या संभाषणाचा काही भाग २० नोव्हेंबरला पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856243.html
७. सत्संगात ‘सुप्रियाताईंच्या माध्यमातून ‘देवच बोलत आहे’, असे वाटते’, असे श्री. घनशाम गावडे यांनी म्हटल्यावर ‘प.पू. डॉक्टरच आवश्यक ते सर्व बोलून घेतात’, असे सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगणे
श्री. घनशाम गावडे : पूर्वी मीही सुप्रियाताईंच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला बसायचो. तेव्हा मी शिकण्याच्या स्थितीत असल्याने मला चांगले वाटायचे. आता मी ताईंच्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या सत्संगाला जातो, तर मला ‘त्यांचा सत्संग कधी होईल ?’, असे वाटते. ताई जेव्हा सत्संग घेतात, तेव्हा ‘तेथे ताई नसून प्रत्यक्ष देवीच बोलत आहे’, असे मला जाणवते. मी ताईंना सांगितले, ‘‘ताई, सत्संगात तुम्ही बोलत नाही, तर तुमच्या माध्यमातून देवच बोलत असतो.’’
सौ. सुप्रिया माथूर : प.पू. डॉक्टर, मला तर कोणतेच दृष्टीकोन ठाऊक नाहीत आणि इतरही काही माहिती नाही; पण तुमचे साधकांवर एवढे प्रेम आहे की, मला जरी काही माहिती नसली, तरी माझ्याकडून असे काही सांगितले जाते की, त्यांना आवश्यक ते मिळते किंवा त्यांना प्रोत्साहन मिळते.
सौ. राधा गावडे : परम पूज्य डॉक्टर, सुप्रियाताईला कधी तिचेे कौतुक म्हणून काही सांगितले, तर ती स्वतःकडे त्याचे श्रेय मुळीच घेत नाही. ‘देवानेच ते सुचवले आणि बोलून घेतले’, असे म्हणते.
८. साधकांची ‘ऐकण्याची स्थिती आहे कि नाही ?’ हे ओळखून त्यांना ‘योग्य काय असायला हवे’, हे सांगावे !
सौ. सुप्रिया माथूर : काही प्रसंगांमध्ये मी यजमानांना ‘योग्य काय असायला हवे’, हे सांगते; पण काही वेळेला माझ्याकडे पत्नी म्हणून पाहिल्याने गांभीर्याने ऐकून घेण्याचा त्यांचा भाग न्यून असतो. त्यामुळे ‘त्यांची ऐकण्याची स्थिती कशी आहे’, असा विचार करून मी त्यांच्याशी बोलते. ज्या वेळी मला वाटते की, ‘ते अंतर्मुख नाहीत. तेव्हा मी त्यांना काहीच सांगत नाही.’
सौ. कस्तुरी भोसले : परम पूज्य डॉक्टर, या संदर्भात एका साधिकेच्या संदर्भात असे लक्षात आले की, जेव्हा तिच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढलेली असते, त्या वेळी ती मुळीच ऐकण्याच्या स्थितीत नसते. नंतर त्रास न्यून झाल्यावर तिला काही सांगितले, तर ती स्वीकारते आणि क्षमा मागते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान.
९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘व्यष्टी साधनेतील भावापेक्षा समष्टी साधनेत भाव हवा’, असे सांगणे
श्री. सुरजीत माथूर : गुरुदेव, माझे भावजागृतीचे प्रयत्न अल्प होतात. मला भावाच्या स्थितीत रहाता येत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : व्यष्टी साधनेत भाव असतो. भावाच्या स्थितीला रहायचे, म्हणजे व्यष्टी साधनेच्या स्थितीत रहायचे. आपल्याला त्या स्थितीत रहायचे नाही. आपल्याला समष्टी साधनेतील भाव हवा, म्हणजे एखादी सेवा करतांना ती भावपूर्ण व्हायला हवी. इतरांशी बोलतांना भावपूर्ण रितीने बोलता आले पाहिजे !’
(सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगातील संभाषण) (समाप्त)