निष्‍क्रिय अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी न्‍यायालयाने जामीन नाकारल्‍याने ज्ञानेश महाराव याला तात्‍काळ अटक करा ! – प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोट

डावीकडून सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोटचे श्री. प्रसाद पंडित, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे

सोलापूर – हिंदूंचे आराध्‍य दैवत श्रीराम आणि लक्षावधी हिंदूंचे श्रद्धास्‍थान असलेले अक्‍कलकोट येथील श्री स्‍वामी समर्थ यांच्‍याविषयी अनुद़्‍गार काढल्‍याप्रकरणी भारतीय न्‍याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९९ आणि ३०२ अन्‍वये अक्‍कलकोट पोलीस ठाणे येथे माजी संपादक ज्ञानेश महाराव याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आलेला आहे, तसेच मा. न्‍यायालय सोलापूर यांनी या दखलपात्र गुन्‍ह्यात जामीन नाकारल्‍याने आरोपी ज्ञानेश महाराव याला तातडीने अटक करण्‍यात यावी, अशी मागणी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने निवेदनाद्वारे करण्‍यात आली. या वेळी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोटचे श्री. प्रसाद पंडित, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. दत्तात्रय पिसे, सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी आदी उपस्‍थित होते.

नवी मुंबई येथील विष्‍णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेड या संघटनेच्‍या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव याने सार्वजनिक मंचावर देवतांविषयी अकारण अपकीर्ती करणारी आणि अपमानास्‍पद विधाने केली होती. यामुळे अक्‍कलकोट पोलीस ठाणे येथे त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आलेला आहे. या विरोधात त्‍यांनी मा. सोलापूर जिल्‍हा न्‍यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्‍यायालयाने जामीन नामंजूर केल्‍यानंतर आरोपीला तात्‍काळ अटक करणे अपेक्षित होते; मात्र गुन्‍हा घडून तब्‍बल २ महिने होऊनही कारवाई करण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे कारवाई करण्‍यात दिरंगाई केल्‍याबद्दल संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन माननीय जिल्‍हाधिकारी सोलापूर यांना देण्‍यात आले.

निवेदनात म्‍हटले आहे की, हिंदु सहिष्‍णु आहेत. कायदेशीर प्रक्रियेवर विश्‍वास ठेवतात; म्‍हणून त्‍यांच्‍या भावना दुखावणार्‍या व्‍यक्‍तींना न्‍यायालयाने जामीन अर्ज नामंजूर करूनही अटक केली जात नाही, हे अनाकलनीय आहे. जर हीच घटना अन्‍य धर्माच्‍या संदर्भात घडली असती, तर आरोपी तुरुंगात असता. याबाबत प्रशासनाच्‍या निष्‍क्रियतेमुळे हिंदु समाजात तीव्र असंतोष व्‍यक्‍त होत आहे. माननीय न्‍यायालयाचे आदेश असूनही कार्यवाही होत नसल्‍याने प्रशासनाची कार्यक्षमता आणि निष्‍पक्षता यावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित होत आहेत. पोलिसांना देवतांचे विडंबन मान्‍य आहे का ? असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. श्रीराम भक्‍त, स्‍वामी समर्थ भक्‍त आणि समस्‍त हिंदु समाज यांच्‍यात पोलिसांच्‍या अशा भूमिकेमुळे असंतोष पसरला आहे. त्‍यामुळे ज्ञानेश महाराव याला तात्‍काळ अटक न केल्‍यास न्‍यायालयाचा अवमान केल्‍याबद्दल याचिका प्रविष्‍ट (दाखल) करणार आहोत.

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी का करावी लागते ?
  • प्रशासन स्‍वतःहून कारवाई का करत नाही ?