सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत घोटाळा झालेल्या ‘बिटकॉईन’मधील पैसा वापरला !
|
मुंबई – महाराष्ट्रात चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्याचे पैसे वापरले. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. रवींद्रनाथ पाटील यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे गंभीर आरोप केले असून या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचेही यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळले असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. रवींद्रनाथ पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या आवाजातील ध्वनीमुद्रण सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केले आहे.
‘बिटकॉईन’ काय आहे ?‘बिटकॉईन’ हे विविध आभासी चलनांपैकी एक चलन आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी या चलनाचा वापर वाढत आहे; मात्र भारतामध्ये अद्यापही या चलनाला मान्यता प्राप्त झालेली नाही. याविषयी रिझर्व्ह बँकेकडून धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया चालू आहे. |
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्याकडून लोकसभा आणि महाराष्ट्र निवडणूक यांच्यासाठी ‘बिटकॉईन’चा वापर !
रवींद्रनाथ पाटील म्हणाले, ‘‘सारथन’ नावाच्या लेखापरीक्षण करणार्या आस्थापनाचे गौरव मेहता यांनी ४ दिवसांपूर्वी माझ्याशी संपर्क करून ही माहिती दिली. वर्ष २०१८ मध्ये ‘बिटकॉईन’चा चुकीचा उपयोग केल्याप्रकरणी मला अटक झाली. यामध्ये मी १४ महिने कारागृहात होतो. प्रत्यक्षात बिटकॉईनचा चुकीचा उपयोग पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांनी सुप्रिया सुळे अन् नाना पटोले यांच्या सांगण्यावरून केला. सुप्रिया सुळे यांनी ‘बिटकॉईन’ खरेदी करून त्याचा पैसा लोकसभेच्या निवडणुकीत वापरला आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीतही बिटकॉईनचा पैसा वापरला जात आहे. चुकीचा उपयोग झालेले ‘बिटकॉईन’चे ‘वॉलेट’ पोलीस अधिकारी अमिताभ भारद्वाज यांनी पालटले; मात्र या प्रकरणी मला आणि माझ्या साक्षीदारांना अटक करण्यात आली. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यासाठी गौरव मेहता यांनी दुबई येथे जाऊन ‘बिटकॉईन’चे पैशांत रूपांतर केले. हा पैसा महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी वापरला गेला. सुप्रिया सुळे यांनी गौरव मेहता यांना स्वत:ला ‘बिटकॉईन’ विकायला सांगितले, तेव्हा चौकशीची काळजी करू नका. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हे प्रकरण आम्ही सावरू.’’
‘बिटकॉईन’च्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड !
मुंबई – ‘बिटकॉईन’द्वारे प्राप्त झालेला पैसा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्याचा गंभीर आरोप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी नाव घेतलेल्या आणि प्रसारित केलेल्या ध्वनीमुद्रणामधील व्यक्ती गौरव मेहता यांच्या रायपूर येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने २० नोव्हेंबर या दिवशी धाड घातली आहे.
माध्यमांना हाताशी धरून भाजपकडून आमच्या अपकीर्तीचे षड्यंत्र ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्दैवाने भाजपच्या सांगण्यावरून खोडसाळपणे आमची अपकीर्ती चालू आहे. माझी अपकीर्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा कायदेशील कारवाई करण्याविना आमच्याकडे अन्य पर्याय रहाणार नाही.
ध्वनीमुद्रण आणि संदेश बनावट ! – खासदार सुप्रिया सुळे
माझ्याकडे याविषयीचे ‘व्हॉईस रेकॉर्डिंग’ (ध्वनीमुद्रण) आल्यावर मी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरभाष केला. याविषयी मी १९ नोव्हेंबर या दिवशी ऑनलाईन तक्रार केली आहे. हे ‘व्हॉईस रेकॉर्डिंग’ आणि संदेश खोटे आहेत.