III World War : तिसरे महायुद्ध चालू झाले ! – रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव
अमेरिकेने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची अनुमती दिल्याचा परिणाम
मॉस्को (रशिया) – तिसरे महायुद्ध चालू झाले आहे. अमेरिकेने युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करण्यास अनुमती देऊन ते चालू केले आहे, असे विधान रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी केले आहे. २ दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाच्या विरोधात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रेे वापरण्यास मान्यता दिली होती. युक्रेनकडे अमेरिकेची ‘आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टीम’ ही क्षेपणास्त्र प्रणाली असून ती ३०० कि.मी.पर्यंत अचूक आक्रमण करू शकते. पूर्वी युक्रेन ती केवळ त्याच्या सीमेपर्यंतच वापरू शकत होता.
मेदवेदेव म्हणाले की, अण्वस्त्र युद्धात अर्धे जग उद़्ध्वस्त व्हावे, अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची इच्छा आहे. रशियाला चिथावणी देण्यासाठी बायडेन प्रशासन जाणीवपूर्वक असे निर्णय घेत आहे. ट्रम्प यांच्या सरकारला याचा सामना करावा लागेल.
बायडेन यांच्या निर्णयामुळे रशियाला नवीन आण्विक सिद्धांत पालटण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याचा अर्थ असा की, आपल्या देशावर ‘नाटो’ने डागलेली क्षेपणास्त्रेे रशियावर आक्रमण आहे, असे मानले जाईल. रशिया, युक्रेन किंवा कोणत्याही ‘नाटो’ (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) देशांवर अण्वस्त्रांनी आक्रमण करू शकतो.
पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापरास दिली अनुमती
पुतिन यांनी अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याच्या संदर्भातील नियम पालटले आहेत. यानुसार ज्या देशाकडे अण्वस्त्रेे नाहीत, अशा देशाने अणुशक्ती असलेल्या देशाच्या पाठिंब्याने रशियावर आक्रमण केले, तर हे आक्रमण रशियाविरुद्ध युद्धाची घोषणा मानली जाईल. अशा स्थितीत रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकतो.