Delhi Air Pollution : देहली भारताची राष्‍ट्रीय राजधानी रहावी का ?

वाढते प्रदूषण पहाता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा प्रश्‍न

काँग्रेसचे खासदार शशी थरूर

नवी देहली – देहली अधिकृतपणे जगातील सर्वांत प्रदूषित शहर आहे, चौपट धोकादायक पातळी, ढाकापेक्षा परिस्‍थिती जवळजवळ पाच पट वाईट आहे. आपले सरकार वर्षानुवर्षे ही भीषण परिस्‍थिती पहात आहे आणि त्‍याबद्दल काहीही करत नाही, हे समजण्‍याच्‍या पलीकडचे आहे. देहली भारताची राष्‍ट्रीय राजधानी रहावी का ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी उपस्‍थित केला आहे. थरूर यांनी ‘एक्‍स’वर पोस्‍ट करत हा प्रश्‍न केला.

तसेच त्‍यांनी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची सूचीही दिली. हिवाळा प्रारंभ होताच देहलीतील हवेची गुणवत्ता प्रतिवर्षी विक्रमी प्रमाणात ढासळत असते. या वर्षीही हीच स्‍थिती आहे. प्रचंड वाढलेल्‍या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना शहरात राहणे जवळपास अशक्‍य बनत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार थरूर यांनी वरील प्रश्‍न उपस्‍थित केला.

कुणालाच काही वाटत नाही !

थरूर यांनी पुढे म्‍हटले की, मी वर्ष २०१५ पासून अनेक तज्ञ, भागधारक यांसह खासदारांसमवेत चर्चा केली; परंतु गेल्‍या वर्षापासून ते सोडून दिले; कारण काहीही पालटलेले दिसत नव्‍हते आणि कुणालाही काही फरक पडतांना दिसला नाही. या शहरात नोव्‍हेंबर ते जानेवारी या महिन्‍यांत वास्‍तव्‍य करणे शक्‍य नसते आणि उरलेल्‍या वर्षभरात जेमतेम रहाता येऊ शकते. खरेच ही देशाची राजधानी रहावी का?

देहलीतील आम आदमी पक्षाच्‍या सरकारने हवेच्‍या ढासळलेल्‍या गुणवत्तेला ‘वैद्यकीय आणीबाणी’ (मेडिकल इमर्जन्‍सी) म्‍हटले आहे आणि नागरिकांच्‍या आरोग्‍याच्‍या सुरक्षेसाठी आवश्‍यक उपाययोजना करण्‍याचे आवाहन केले. तसेच वाईट हवेमुळे देहली आणि राष्‍ट्रीय राजधानी परीक्षेत्र येथील (एन्.सी.आर्.मधील) शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन चालवली जात आहेत.

संपादकीय भूमिका

  • या स्‍थितील सर्वाधिक उत्तरदायी सर्वाधिक काळ देशावर राज्‍य करणारी काँग्रेसच आहे. राजधानी पालटण्‍यापेक्षा यावर कठोर उपाययोजना का काढली जात नाही, हाच प्रश्‍न आहे !
  • ‘देशातील राजकीय प्रदूषण इतके आहे की, देशात राजकीय पक्ष आणि राजकारणी अस्‍तित्‍वात आहेत का ?’ असा प्रश्‍न जनतेच्‍या मनात उपस्‍थित झाला आहे !