Canada Allegations On Narendra Modi : (म्‍हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या कटाची माहिती होती !’ – कॅनडाचा आरोप

कॅनडाचा अश्‍लाघ्‍य आरोप

खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

ओटावा (कॅनडा) – कॅनडाने खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणात प्रथम भारतावर, भारताच्‍या दूतावासातील अधिकार्‍यांवर, नंतर भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्‍यावर आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर आरोप केला आहे. ‘हरदीप सिंह निज्‍जर याची हत्‍या आणि त्‍याच्‍याशी संबंधित अन्‍य कटाची पूर्व माहिती नरेंद्र मोदी यांना होती’, असे कॅनडाच्‍या सुरक्षायंत्रणांचे मत असल्‍याचे वृत्त कॅनडातील प्रसिद्ध दैनिकाने अधिकार्‍यांच्‍या हवाल्‍याने दिले आहे. कॅनडामधील भारताच्‍या परकीय हस्‍तक्षेपाच्‍या कारवायांचे गुप्‍तचर मूल्‍यांकनावर काम करणार्‍या एका वरिष्‍ठ राष्‍ट्रीय सुरक्षा अधिकार्‍याने हा दावा केला आहे. या अधिकार्‍याची ओळख उघड करण्‍यात आलेली नाही.

‘ग्‍लोब अँड मेल’ दैनिकाच्‍या वृत्तानुसार या अधिकार्‍याने सांगितले की, कॅनडा  आणि अमेरिकी गुप्‍तचर यांनी निज्‍जर हत्‍येची कारवाई भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्‍याशी जोडली आहे. नरेंद्र मोदी यांचे विश्‍वासू राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हेदेखील यात होते. अशा परिस्‍थितीत नरेंद्र मोदी यांनाही या सगळ्‍याची माहिती असू शकते, हे स्‍पष्‍ट आहे.

कॅनडाकडे पुरावा नाही

या अधिकार्‍याने म्‍हटले आहे की, कॅनडाकडे मोदी यांना हत्‍येबद्दल माहिती असल्‍याचा कोणताही सबळ पुरावा नाही; परंतु असे मानले जाऊ शकत नाही की, भारतातील ३ वरिष्‍ठ राजकीय व्‍यक्‍तींना (अमित शहा, एस्. जयशंकर आणि अजित डोवाल) या हत्‍येबद्दल माहिती नसते.

कॅनडाने पुन्‍हा आरोप केले !

कॅनडाच्‍या ‘प्रिव्‍ही कौन्‍सिल’ कार्यालयाने एका निवेदनात म्‍हटले आहे की, पोलिसांनी सांगितले आहे की, भारत सरकारचे हस्‍तक कॅनडातील गंभीर गुन्‍हेगारी कृत्‍यांमध्‍ये गुंतले आहेत; मात्र कॅनडाच्‍या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर कोणतेही आरोप केलेले नाहीत.

संपादकीय भूमिका

कॅनडाकडून आता मर्यादाचे उल्लंघन होत असल्‍याने भारताने कठोर निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आहे. कॅनडावर भारताने संपूर्ण बहिष्‍कार घालत त्‍याच्‍याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजेत !