Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध वाढण्याचा धोका : अमेरिकेने कीवमधील दूतावास केला बंद !
वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कीवमधील तिचा दूतावास बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच दूतावासातील अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कीवमधील त्याच्या दूतावासावर हवाई आक्रमण होऊ शकते, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची अनुमती दिल्यानंतर परिस्थिती चिघळली!
रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असतांना अमेरिकेने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी आक्रमण करण्याची अनुमती दिली. त्यामुळे दोन्ही देशांतील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनली आहे. रशियानेही याविषयी धमकी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुधारित आण्विक धोरणावर स्वाक्षरी केली आहे. या धोरणाच्या अंतर्गत रशिया-युक्रेन युद्धात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह केलेले आक्रमण हे तिसर्या देशाचा सहभाग मानला जाईल आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया अण्वस्त्र आक्रमण करू शकते.
युरोपीय देशांना वाटते युद्धाची भीती !
ताज्या घडामोडींनंतर परिस्थिती इतकी तणावपूर्ण बनली आहे की, नॉर्वे, स्विडन आणि फिनलँड या ३न युरोपीय देशांमध्ये घबराट पसरली आहे. या तिन्ही देशांच्या सरकारांनी त्यांच्या नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सैनिकांना युद्धासाठी सिद्ध रहाण्यास सांगितले आहे. स्विडनने तर अणूयुद्ध झाल्यास किरणोत्सर्गापासून रक्षण होण्यासाठी आयोडिनच्या गोळ्या विकत घ्याव्यात आणि ठेवाव्यात, असे निर्देश दिले आहेत.