India’s UN Ambassador On Pakistan : पाकशी चर्चेची पहिली अट म्हणजे त्याने आतंकवाद संपवणे !
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या राजदूताचे वक्तव्य
न्यूयॉर्क (अमेरिका) – जेव्हा पाकिस्तान सीमेपलीकडील आतंकवाद पूर्णपणे संपवेल, तेव्हाच पाकिस्तानशी चर्चा चालू होऊ शकते, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी केले. भारत सीमेपलीकडील आतंकवादाचा शिकार बनला आहे आणि आतंकवादाच्या संदर्भात आमचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. पाकसमवेत आमचे मुख्य सूत्र हे आतंकवादच आहे, असेही ते या वेळी म्हणाले. हरीश हे ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’ या कोलंबिया विश्वविद्यालयाच्या विभागाने ‘रेस्पाँडिंग टू मेजर ग्लोबल चॅलेंजेस : दी इंडिया वे’ (महत्त्वपूर्ण जागतिक आव्हानांना भारताच्या दृष्टीकोनातून प्रतिसाद देणे) या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमात राजदूत हरीश यांना पाकिस्तानविषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले की,
१. भारताचा पाकवरील विश्वास उडाला आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता; परंतु पाकिस्तानकडून भारतात चालू असलेल्या आतंकवादी कारवायांमुळे भारताचा विश्वास उडाला आहे.
२. आतंकवाद हा मानवतेसाठी ‘अस्तित्वाचा धोका’ !
भारत दीर्घकाळापासून सीमापार आणि जागतिक आतंकवादाचा बळी ठरला आहे. आतंकवाद हा मानवतेसाठी ‘अस्तित्वाचा धोका’ आहे. याला सीमा माहिती नाहीत, राष्ट्रीयत्व ठाऊक नाही.
३. आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच आतंकवादाला सामोरे जाणे शक्य !
आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच आतंकवादाला सामोरे जाता येऊ शकते. भारताचे ध्येय आतंकवादाचा सामना करण्यासाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना एकत्र घेऊन पुढे जाण्यावर आहे. आम्हाला आणखी एक ९/११ चे आक्रमण अथवा २६/११ सारखे मुंबईवरील आक्रमणही नको आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तान आतंकवादाचा निर्माता आणि पालनकर्ता असल्याने तो आतंकवाद कधीच संपुष्टात आणणार नाही. त्यासाठी भारतालाच इस्रायलप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करावी लागेल, हेच खरे ! |