Talks On India-China Air Services : जी-२० शिखर परिषदेत भारत-चीन थेट विमानसेवा चालू करण्याविषयी चर्चा !
मानसरोवर यात्रा पुन्हा चालू होण्याची शक्यता
रिओ दि जानेरो (ब्राझिल) – येथे जी-२० शिखर परिषद पार पडली. या परिषदेमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली. यामध्ये भारत-चीन थेट विमानसेवा चालू करणे आणि मानसरोवर यात्रा पुन्हा चालू करणे याविषयीही चर्चा झाली. मानसरोवर आणि त्याच्या बाजूला असलेला कैलास पर्वत यांना हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. हा भाग तिबेटमध्ये येतो. तिबेट हे चीनच्या कह्यात असल्यामुळे मानसरोवर यात्रा करण्यासाठी चीनमधून जावे लागते.
या बैठकीत दोन्ही देशांमधील सीमावादावर ५ वर्षांनंतर विशेष प्रतिनिधींची बैठक बोलावण्याचे मान्य करण्यात आले. वर्ष २०२५ मध्ये होणार्या जी-२० शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी दक्षिण आफ्रिकेला मिळाली आहे. जी-२० देशांच्या सर्व सदस्यांनी जारी केलेल्या संयुक्त घोषणेमध्ये जगात वाढत चाललेल्या उपासमारीच्या विरोधात लढण्यासाठी जागतिक करार, युद्धग्रस्त गाझासाठी अधिक साहाय्य आणि मध्य पूर्व अन् युक्रेनमधील युद्ध संपवण्याचे आवाहन करण्यात आले.