Sambhal Masjid Earlier Harihar Mandir : दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या २ घंट्यांनी करण्यात आले सर्वेक्षण !
संभल (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद पूर्वीचे हिंदु मंदिर
संभल (उत्तरप्रदेश) – येथील शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आदित्य सिंह यांनी १९ नोव्हेंबरला दिला. न्यायालयाने येत्या ७ दिवसांत चित्रीकरण आणि छायाचित्र काढण्यासह सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. यासाठी न्यायालयाने रमेशसिंह राघव यांना अॅडव्होकेट कमिश्नर (अधिवक्ता आयुक्त) नियुक्त केले. यानंतर अवघ्या २ घंट्यांनंतर या मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले. कैलादेवी मंदिराचे महंत ऋषीराज गिरि महाराज यांनी दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
न्यायालयाने दुपारी ४ वाजता आदेश दिल्यानंतर प्रशासनाने ५ सदस्यीय समिती स्थापन केली. सायंकाळी ६.१५ वाजता जिल्हाधिकारी पानसिया, पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णाई यांच्यासह सर्वेक्षण पथक जामा मशिदीत पोचले. त्यांच्या समवेत समितीही होती. येथे २ घंटे सर्वेक्षण करून रात्री ८.१५ वाजता सर्व जण बाहेर आले. सर्वेक्षण पथकाने मशिदीच्या आतील चित्रीकरण केले आणि छायाचित्रे काढली. त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.
मशिदीचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मिळताच मशिदीजवळ अनेक लोक जमा झाले होते. त्यांना पोलिसांनी दूर केले. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याचिकाकर्ते महंत ऋषीराज गिरि महाराज यांना मशिदीत प्रवेश देण्यात आला नाही. सर्वेक्षण होईपर्यंत ते बाहेरच उभे होते. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन हे महंत ऋषी गिरी यांचे अधिवक्ता आहेत. पू. हरिशंकर जैन यांचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर हेही सर्वेक्षणाच्या वेळी मशिदीत होते.
शाही जामा मशीद पूर्वीचे श्री हरिहर मंदिर !
सदर कोतवाली परिसरात कोट पूर्वेला शाही जामा मशीद आहे. शाही जामा मशीद पूर्वीचे श्री हरिहर मंदिर असल्याचा दावा महंत ऋषीराज गिरि महाराज यांनी याचिकेत केला आहे. मशीद पूर्वी मंदिर असल्याचे बरेच पुरावे आहेत. संभल येथेच भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की होणार आहे.
(म्हणे) ‘मशिदीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही !’ – मशीद समिती
सर्वेक्षणानंतर या शाही जामा मशीद समितीचे अध्यक्ष जफर अली वकील म्हणाले की, पथकाने जामा मशिदीच्या प्रत्येक भागाचे सर्वेक्षण केले आहे. आम्हीही पथकासमवेत होतो. आम्ही त्यांना सहकार्य केले. सर्वेक्षणात आतापर्यंत कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही, ज्यामुळे शंका निर्माण होईल. ही प्रत्यक्षात जामा मशीद आहे, असे गृहीत धरले जाईल.
जे सर्वेक्षण करायचे होते ते सर्व झाले ! – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पानसिया म्हणाले की, आयुक्तांनी सर्वेक्षण केले आहे. फिर्यादीही उपस्थित होते. प्रतिवादी आणि समितीचे सदस्यही उपस्थित होते. सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. एकदाच सर्वेक्षण पूर्ण केले. आवश्यकता वाटल्यास भविष्यात ते न्यायालयात जातील आणि आणखी सर्वेक्षण हवे असल्यास ते केले जाईल. जे सर्वेक्षण करायचे होते ते सर्व झाले आहे.
मशिदीमध्ये अजूनही हिंदु मंदिराशी संबंधित अनेक चिन्हे आणि खुणा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
अधिवक्ता विष्णु शंकर जैन याविषयी म्हणाले की, वर्ष १५२९ मध्ये बाबराने मंदिर पाडले आणि मशिदीत रूपांतर केले. आज त्यासाठी दावा करण्यात आला; कारण ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संरक्षित क्षेत्र आहे. अशा संरक्षित क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ शकत नाही. मशिदीमध्ये अजूनही हिंदु मंदिराशी संबंधित अनेक चिन्हे आणि खुणा आहेत. उत्तरप्रदेश सरकार, मशीद समिती आणि त्यात ज्यांचे संबंध आहेत त्यांना या प्रकरणात पक्षकार करण्यात आले आहे. आम्ही प्रत्येक सुनावणीला येऊ. जेव्हा जेव्हा मला आवश्यक असेल, तेव्हा मी न्यायालयात येऊन माझे म्हणणे मांडेन. वादग्रस्त जागेचा मशीद म्हणून वापर करण्यावर बंदी घालावी. ही जागा हिंदु धर्म आणि इतिहास यांच्याशी संबंधित आहे आणि तिचा वापर कोणत्याही धार्मिक विवादाचे कारण बनू नये.
(म्हणे) ‘तेथे मशीद होती, आहे आणि राहील !’ – समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क
संभलचे समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क म्हणाले की, संभलची जामा मशीद ऐतिहासिक आणि पुष्कळ जुनी आहे. वर्ष १९९१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, वर्ष १९४७ पासून जी काही धार्मिक स्थळे तशीच आहेत, ती त्यांच्या जागी रहातील. तरीही काही लोकांना देशाचे आणि राज्याचे वातावरण खराब करायचे आहे. ते एक इंच जागेवरही आक्षेप घेऊ शकत नाहीत. तिथे एक मशीद होती, मशीद आहे आणि नेहमीच मशीद असेल.
संपादकीय भूमिकादेशातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे तात्काळ सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जनतेसमोर ठेवल्यास जगाला सत्य परिस्थिती समजेल आणि हिंदूंवर झालेल्या आक्रमणाचा इतिहास समोर येईल ! |