वक्‍फ कायदा हा असंवैधानिकच ! – संजीव देशपांडे, ज्‍येष्‍ठ विधीज्ञ

कार्यक्रमात बोलतांना ज्‍येष्‍ठ विधीज्ञ संजीव देशपांडे

छत्रपती संभाजीनगर – सध्‍याचा ‘वक्‍फ कायदा’ हा धर्मविरोधी नसून तो राज्‍यघटनाविरोधी आहे. सर्व जाती-धर्माच्‍या लोकांसाठी हा कायदा अन्‍यायकारक आहे. त्‍यात सुधारणा होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे ज्‍येष्‍ठ विधीज्ञ संजीव देशपांडे यांनी येथे केले. १८ नोव्‍हेंबर या दिवशी ‘अधिवक्‍ता परिषद देवगिरी प्रांतच्‍या हायकोर्ट युनिट’च्‍या वतीने आयोजित ‘वक्‍फ कायद्यातील स्‍वागतार्ह सुधारणा’, या विषयावर व्‍याख्‍यानात ते बोलत होते. या वेळी ‘हायकोर्ट युनिट’चे अध्‍यक्ष अधिवक्‍ता नितीन चौधरी, अधिवक्‍त्‍या संगीता बागूल उपस्‍थित होत्‍या.

ते पुढे म्‍हणाले, ‘‘जो अन्‍यायकारक आहे, तो मुळात कायदाच नसतो. सध्‍या लागू असलेल्‍या वक्‍फ कायद्याने जेवढी हानी इतर धर्मियांची होते, त्‍याहून अधिक हानी मुसलमान धर्मियांची होत आहे. त्‍यांच्‍या मिळकती ‘वक्‍फ बोर्डा’च्‍या कह्यात दिल्‍या जात आहेत.’’ कार्यक्रमाचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता श्रीकांत अदवंत म्‍हणाले की, ब्रिटीश काळातील प्रचलित ट्रस्‍ट कायद्याची मोडतोड करून वक्‍फ कायदा वर्ष १९९५ मध्‍ये अमलात आणला आहे.