लाल बसने (‘एस्.टी.’ने) प्रवास करणार्यांच्या संख्येत पुणे विभागात ५० सहस्रांनी वाढ !
पुणे – राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात मागील ३ वर्षांत प्रवाशांची संख्या ५० सहस्रांनी वाढली आहे; मात्र असे असले, तरी एस्.टी. गाड्यांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. बसची संख्या अल्प असल्याने प्रवासी आणि एस्.टी. प्रशासन यांना कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो, तर प्रशासनाला अल्प प्रतिसादाच्या मार्गावरील फेर्या रहित कराव्या लागतात. या दोन्ही गोष्टींमुळे आर्थिक हानी होत आहे. (यावर प्रशासन कधी उपाययोजना काढणार ? – संपादक)
एस्.टी. प्रशासनाने महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना प्रवास विनामूल्य केला आहे. यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असली, तरी आर्थिक लाभाचे प्रमाण अत्यल्प आहे. पुणे विभागात प्रवाशांची संख्या वाढली, तरी बसची उपलब्धता नाही. पुणे विभागाला आणखी १६० बसगाड्यांची आवश्यकता आहे. येत्या काही दिवसांत नवीन बसगाड्या मिळणार असून प्रवाशांची काही प्रमाणात सोय होईल, असे एस्.टी. विभागाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :जनतेला सवलतींच्या सुविधा देणारे; पण प्रवासाची सोय न करणारे असंवेदनशील एस्.टी. महामंडळ काय कामाचे ? |