दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बविआच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला !; मुंबईत ४१ लाख ९१ सहस्र रुपये जप्त !
बविआच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला !
मुंबई – विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावर विनोद तावडे म्हणाले, ‘‘मी निवडणुकीसंदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे गेलो होतो. त्या वेळी बविआच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला. निवडणूक आयोग आणि पोलीस अन्वेषण करत आहेत. मी गेली ४० वषेर्र् राजकारणात आहे. जे सत्य आहे, ते समोर आहे. याची सखोल चौकशी व्हावी, असे मलाही वाटते.’’
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
मुंबईत ४१ लाख ९१ सहस्र रुपये जप्त !
मुंबई – मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४१ लाख ९१ सहस्र रुपये मुंबई लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी प्राप्तीकर विभागाला माहिती देण्यात आली असून ते अन्वेषण करणार आहेत.
२ नायजेरियनांकडून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त !
पनवेल – तळोजा वसाहतीमध्ये दोन परदेशी नागरिकांकडून पोलिसांनी मॅफेड्रोन, कोकेन असे साडेपाच कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यांच्या रहाण्याची सोय करणार्या घरमालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. ओनयेका हिलरी इलोडिन्सो आणि चिडीबेरे खरिस्तोफर मुओघालु अशी नायजेरियन लोकांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
४ महिला कर्मचार्यांच्या वाहनाला अपघात !
जळगाव – किनगाव येथे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जाणार्या ४ महिला कर्मचार्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात चार महिला कर्मचारी घायाळ झाल्या असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
नाशिक पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना
नाशिक – नाशिक ग्रामीण पोलिसांनी निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. ११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४८ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. १४ देशी बंदुका, ३७ जिवंत काडतुसे, ४३ तलवारी, ९ कोयते-चॉपर, चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.