Tirupati Balaji Darshana AI TECH : तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ अल्प करणार ! – तिरुमला तिरुपती देवस्थानम् मंडळ
तिरुपती (आंध्रप्रदेश) : भगवान वेंकटेश्वर बालाजी मंदिरात दर्शनासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी अल्प करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंजेलिजन्स) वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे दर्शनासाठीची प्रतीक्षा वेळ अनुमाने अर्धा घंटा अल्प होऊन २-३ घंटे होईल, अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानम् (टीटीडी) मंडळाचे अध्यक्ष बी.आर्. नायडू यांनी दिली. मंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांची माहिती ते पत्रकारांना देत होते. ‘तिरुपतीच्या स्थानिक लोकांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी विशेष दर्शनाची सुविधा दिली जाईल’, असेही त्यांनी सांगितले.
अहिंदूंची नियुक्ती करू नये, असे सरकारला सांगणार !
नायडू यांनी सांगितले की, मंदिर प्रशासनात किती अहिंदू कर्मचारी आहेत ?, याचे मूल्यांकन मंडळ करणार आहे. आम्ही राज्य सरकारला पत्र लिहू आणि तिरुमला मंदिर ही हिंदु धार्मिक संस्था असून तिच्यात अहिंदु कर्मचार्यांची नियुक्ती करू नये, असे सांगू. एकतर त्यांना इतर विभागांमध्ये सामावून घेण्याची किंवा त्यांना ऐच्छिक निवृत्ती देण्याची विनंती सरकारला केली जाईल.’ वर्ष २०१८ च्या अहवालानुसार तिरुपती मंदिरामध्ये ४४ कर्मचारी अहिंदू आहेत.
राजकीय विधाने करण्यावर बंदी !
नायडू पुढे म्हणाले की, मंदिराशी संबंधित लोक तिरुमला येथे कोणतीही राजकीय विधाने करणार नाहीत, असा निर्णयही मंडळाने घेतला. जर कुणी असे केले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.