ऐन निवडणूक काळात भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सकडून मतदारांना वेठीस धरण्याचा प्रकार !

  • महाराष्ट्रात मतदानाचा अधिकार बजावण्यात ‘खासगी ट्रॅव्हल्स’कडून अव्वाच्या सव्वा दर आकारून खोडा !

  • निवडणुकीसाठी लोक त्यांच्या मूळ गावी जात असतांना दुप्पट बस भाडे आकारण्याचा प्रकार !

मुंबई, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी एकीकडे निवडणूक आयोग मागील काही दिवसांपासून रात्रंदिवस झटत आहे. मतदान वाढण्यासाठी सरकारनेही २० नोव्हेंबर या दिवशी सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. दुसरीकडे मात्र ऐन निवडणुकीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकिटाचे भरमसाठ दर आकारून मतदारांना वेठीस धरले आहे. मुंबईत रहाणार्‍या अनेक चाकरमान्यांची गावातील मतदारसूचीत नोंद आहे. खासगी टॅ्रव्हल्सच्या भरमसाठ तिकीटदर वाढीचा फटका या सर्वसामान्य वर्गातील मतदारांना होण्याची शक्यता आहे.

१. १९ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतून अकलूज (सोलापूर) येथे जाण्यासाठी वातानुकूलित गाडीच्यो स्लीपर कोचच्या तिकिटाची किंमत १ सहस्र ८०० रुपये इतकी होती. मुंबई ते अकलूजपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सचे नियमित तिकिट ८०० ते ९०० रुपये इतके असते; मात्र निवडणूक असल्यामुळे तिकिटांचे दर दुपटीने वाढवण्यात आले आहेत.

२. मुंबई ते अकलूज शिवशाही या एस्.टी. महामंडळाच्या गाडीचे तिकीट ७१० रुपये इतके आहे. खासगी टॅ्रव्हल्सच्या भरमसाठ तिकीटवाढीच्या दराविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने तिकीट विक्रेत्यांकडे विचारणा केली असता, अनेक खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या निवडणुकीच्या कामासाठी देण्यात आल्याने नियमितच्या अनेक फेर्‍या रहित करण्यात आल्या असल्याचे सांगितले.

३. शासन आदेशानुसार खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना एस्.टी. बसच्या दराच्या दीडपट अधिक तिकिटाचा दर वाढवण्याची मुभा आहे; मात्र खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांच्या तिकिटांचे दर दुप्पट वाढवले आहेत.

मतदारांना लुटणार्‍या ‘खासगी ट्रॅव्हल्स’वर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी ! – सुराज्य अभियान

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने स्वत:चा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सहस्रो मतदार गावाला वा त्यांच्या मूळ ठिकाणी जात आहेत; मात्र या संधीचा अपलाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांनी अव्वाच्या-सव्वा प्रवास भाडे आकारून मतदारांची लूटमार चालू केली आहे. मतदारांनी आपल्या क्षेत्रात जाऊन मतदान करू नये; म्हणून खासगी ट्रॅव्हल्सवाले एकप्रकारे खोडा घालत आहेत कि काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी या संदर्भात तक्रार करून आम्हाला कळवले आहे. तरी निवडणूक आयोगाने खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून मतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे.

‘या संदर्भात ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने आवश्यक त्या पुराव्यांसह कठोर कारवाईची मागणी एका निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दिवाळीनंतर ५०० ते ७०० रुपये असलेले मुंबई-कोल्हापूर मार्गावरील तिकिटांचे दर १९ आणि २० नोव्हेंबरसाठी जवळपास दुपटीने म्हणजे १ सहस्र ते १ सहस्र ६०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. ‘ऑनलाईन तिकिटिंग प्लॅटफॉर्म्स’वरही अशीच भरमसाठ लूटमार चालू आहे. केवळ मुंबई ते कोल्हापूर, रत्नागिरी अथवा संभाजीनगर या ठिकाणीच नव्हे, तर अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवासभाडे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या भाडेवाढीमुळे मतदारांना त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदान करण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसत आहे’, असेही श्री. मुरुकुटे यांनी सांगितले.

अनैतिक दरवाढ तात्काळ थांबवा !

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. खासगी बसमालक आणि प्रवासी दलाल (एजंट) यांनी भाडेवाढ करून एकप्रकारे लोकशाहीने मतदारांना दिलेल्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार आहे, जो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या समस्येवर तातडीने कठोर पावले उचलून प्रवास भाड्यांवरील ही अनैतिक दरवाढ तात्काळ थांबवावी आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी मूळ ठिकाणी पोचण्याची हमी द्यावी, असेही श्री. मुरुकटे यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

नफेखोर खासगी ट्रॅव्हल्सचा हा लोकशाहीद्रोही प्रयत्न लांच्छनास्पदच आहे. प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या सणांच्या वेळी वाढवण्यात येणार्‍या बस दरांवर काही कारवाई करतांना दिसत नाहीत; परंतु आतातरी त्यांनी कारवाई करावी, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची अपेक्षा आहे.