भारताने इलॉन मस्क यांच्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला उपग्रह !

प्रतिकात्मक छायाचित्र

फ्लोरिडा (अमेरिका) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) १८ नोव्हेंबरच्या रात्री ‘जीसॅट-एन् २’ या उपग्रहाचे येथून यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे प्रक्षेपण अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या रॉकेटमधून करण्यात आले. मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन’ या रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या या ४ सहस्र ७०० किलो उपग्रहाचा उद्देश दुर्गम भागात इंटरनेट सेवा प्रदान करणे, हा आहे.

इस्रोचे ‘मार्क-३’ प्रक्षेपण वाहन अधिकाधिक ४ सहस्र किलो वजन वाहून नेऊ शकते; परंतु ‘जीसॅट’चे वजन ४ सहस्र ७०० किलो होते. त्यामुळे भारताला मस्क यांच्या आस्थापनासमवेत व्यावसायिक करार करावा लागला. या उपग्रहाच्या वापराचा कालावधी १४ वर्षांचा आहे.