मतदानासाठी आमिषे ?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर या दिवशी आहे. या वर्षीची महाराष्ट्रातील निवडणूक ही नेहमीच्या तुलनेत अधिकच चुरशीची आहे. सध्याच्या स्थितीत राजकीय पक्षांचा झालेला गोंधळ पहाता या वर्षी नागरिक मतदान करतील कि नाही ? याची शंका असल्यामुळे ‘नागरिकांनी १०० टक्के मतदान करावे’, असे आवाहन राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटना, संस्था आणि समूह करत आहेत. असे आवाहन करत असतांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दिली जात आहेत, हे अशोभनीय आहे.
पुणे येथे पुणे नागरिक मंच, क्रेडाई, आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणे हॉटेलर्स असोसिएशन, पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलर्स असोसिएशन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टंमेंट्स महासंघ या संस्थांनी पुढाकार घेऊन सवलत देण्याचे घोषित केले आहे. २० नोव्हेंबर या दिवशी मतदान केलेल्या व्यक्तींना ‘इंजिन ऑईल खरेदीवर ५० रुपयांचे पेट्रोल विनामूल्य देऊ’, तर ‘हॉटेलमध्ये १० टक्के सवलत देऊ’, असे सांगितले जात आहे. मुंबई येथे मतदान करणार्यांना ‘पाहिले न मी तुला’ या नाटकावर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. ‘मतदान केल्यानंतर बोटावरील शाई दाखवा आणि २०, २१ अन् २२ नोव्हेंबर या दिवसांमध्ये १० ते १५ टक्के सवलत प्राप्त करा’, अशा आशयाच्या सवलतीही मोठ्या प्र्रमाणात देण्यात येत आहेत. महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन, उपाहारगृह व्यावसायिकांची संघटना असलेली ‘आहार’ संघटना, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटना यांच्यासह इतरही अनेक खासगी उद्योगसमूह, व्यावसायिक आस्थापने आणि छोटी दुकाने यांनीही सवलती दिल्या आहेत.
हे सर्व पहाता जनतेला एवढ्या मोठ्या प्रमाणात आमिषे का द्यावी लागत आहेत ? अर्थात् याचा अभ्यास कुणी करणार नाही, हेही तितकेच खरे ! लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ! निवडणुकांमधील आमिषांची सूची पाहिल्यास लोकशाहीची ही व्याख्या या निवडणुकीत मागे पडत आहे. ‘काम बघून लोकप्रतिनिधीला निवडून द्यायला हवे’, हा विचार तर लोपच पावला आहे. सद्यःस्थितीत जनतेचाही लोकप्रतिनिधींवर विश्वास नाही आणि लोकप्रतिनिधींचाही जनतेवर विश्वास नाही, हेच लक्षात येते. एवढा सर्व खटाटोप करूनही जनता मतदान करील कि नाही ? हे २० नोव्हेंबरलाच समजेल. ही सर्व स्थिती पहाता सुजाण नागरिकांनी हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, हेच मनावर बिंबवायला हवे !
– वैद्या (सुश्री) कु. माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.