मासिक पाळीच्या वेळीही मनाच्या स्वास्थ्यासाठी नामजप करणे महत्त्वाचे !
श्रीमहाराजांकडून (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडून) नाम घेऊन एक तरुण बाई मनापासून नामस्मरणाला लागल्या. त्यांची नामामध्ये चांगली प्रगती होऊ लागली. मासिक पाळीच्या वेळी ३ दिवस मात्र त्या नाम घेत नसत. नामावाचून ३ दिवस वाया जातात, याचे त्यांना वाईट वाटे. ‘त्या अवस्थेत नाम घ्यावे कि न घ्यावे ?’, असा प्रश्न त्यांनी श्रीमहाराजांना विचारला. श्रीमहाराज म्हणाले, ‘माय, त्या अवस्थेत श्वासोच्छ्वास चालतो ना ! जर श्वासोच्छ्वास चालतो, तर नामस्मरण करण्यास काहीच हरकत नाही. प्रत्येक श्वासागणिक नाम घेणे प्रत्येकास आवश्यक आहे. जगण्यासाठी श्वास घेणे, हे जसे मनुष्यास आवश्यक आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे आहे; म्हणून या अवस्थेत नामस्मरण सोडू नये.’ श्रीमहाराज पुढे बोलले, ‘३ दिवसांची जी अडचण आहे, तिचा संबंध शरिराशी असून मनाशी नसल्यामुळे शरीर जरी शूचिर्भूत अवस्थेत नसले, तरी मनाच्या स्वास्थ्यासाठी नामस्मरण करण्यास काहीही हरकत नाही.’ नंतर मंडळीतील एका वृद्ध गृहस्थाकडे पाहून म्हणाले ,‘मासातील ३ दिवस नाम होत नाही, ही या माईची अडचण आहे; पण आपली अडचण तीसही दिवस नामस्मरण होत नाही ही आहे ! ही माय केवढी भाग्याची आहे, हे लक्षात घेऊन तुम्ही तिचे अनुकरण अवश्य करावे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)