पुणे येथील श्री पाताळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा पार पडला !
सैन्याधिकार्यांचा गौरव आणि वीरपत्नींचा सत्कार !
पुणे – येथील श्री पाताळेश्वर मंदिरात १५ नोव्हेंबर २०२४ या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा पार पडला. तेजोमय लखलखत्या दीपांच्या साथीने, सैन्याधिकार्यांचा गौरव आणि वीरपत्नींचा सन्मान केल्यामुळे या दीपोत्सवाला सोनेरी किनार लाभली. ‘श्रीपाताळेश्वर मंदिर उत्सव समिती’ आणि ‘सैनिक मित्रपरिवार’ यांच्या सहकार्याने या नयनरम्य चैतन्यमय सोहळा पार पाडला. भारतीय वायूसेनेतील विंग कमांडर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त) यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यांच्याच हस्ते वीरपत्नींचा सत्कार करून समारंभाची सांगता करण्यात आली.
पाकिस्तानने भारतावर लादलेल्या युद्धाच्या रणांगणांवर हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. वीरपत्नी मधुरा जठार, वीरपत्नी जयश्री धनवडे, वीरपत्नी शारदा इंगळे आणि वीरपत्नी दीपाली मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
वेरूळच्या सुप्रसिद्ध कैलास लेण्याच्या निर्मितीप्रमाणेच श्री पाताळेश्वर मंदिराची निर्मिती, ‘आधी कळस मग पाया’ या तत्त्वावर झालेली आहे. दीपोत्सवामुळे दर्शनाला येणारे भाविक आणि पुणेकर यांची नवीन पिढी यांच्यापुढे हा इतिहास अप्रत्यक्षरित्या पुन्हा सामोर येत आहे.
‘श्री पाताळेश्वर मंदिर उत्सव समिती’चे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे असून ‘सैनिक मित्रपरिवार’ या संस्थेचे प्रमुख श्री. आनंद सराफ हे आहेत. या दोघांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.