निवडणूक विशेष

निवडणुकीनिमित्त विशेष लोकल फेर्‍या !

मुंबई – निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सोयीचे जावे, यासाठी १९ नोव्हेंबरला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला मध्यरात्री विशेष लोकल फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. यामुळे मतदानाच्या दिवशी रात्री उशिरा घरी परतणार्‍या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार.


निवडणूक आयोगाची धाड ५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त !

नाशिक – येथील एका नामांकित उपाहारगृहावर निवडणूक आयोगाच्या पथकाने १८ नोव्हेंबर या दिवशी धाड घातली. या धाडीत ५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईत एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त करण्यात आली आहे.


मतदानासाठी यंत्रणा सिद्ध !

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ सहस्र ११९ मतदारांसाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत असेल. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण सिद्धता झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम् यांनी केले.