संपादकीय : हिंदुहितासाठी मतदान करा !  

विधानसभा निवडणुकीला आता केवळ काही घंटे शिल्लक राहिले आहेत. सर्व पक्षांतील उमेदवारांनी जोरदार प्रचार केल्यानंतर आता प्रत्येकाच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २० नोव्हेंबर या दिवशी मतदान आहे, तर २३ नोव्हेंबर या दिवशी निकाल आहे. ही निवडणूक राज्याची असली, तरी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, नेत्या प्रियांका गांधी आदी राष्ट्रीय नेत्यांच्या सभा झाल्या. देशात लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, हलाल प्रमाणपत्र, बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी; धर्मांतर, गोहत्या, दंगली घडवणे, बंगालची बांगलादेशाच्या दिशेने होणारी वाटचाल, असे अनेक प्रश्न देशासमोर त्यासमवेत देशातील बहुसंख्य हिंदु समाजासमोर उभे आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या अल्प मतदानाची टक्केवारी पहाता, येत्या विधानसभा निवडणुकीत ही टक्केवारी वाढावी, यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी एकगठ्ठा आणि अधिकाधिक मतदान केल्याने काँग्रेस पक्षाचे अधिक खासदार निवडून आले, तर ३२ कोटी हिंदूंनी मतदान न केल्यामुळे भाजपचे अल्प खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे संसदेत एकमताने ‘वक्फ बोर्डा’चा कायदा रहित करता आला नाही. वक्फ बोर्ड कायदा हा हिंदु समाजासमोरील धोक्याची घंटा आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्याला काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांचे समर्थन असल्याने उद्या काँग्रेसचे किंवा काँग्रेस समर्थक नेत्यांचे सरकार आल्यास या कायद्याद्वारे हिंदूंची किती भूमी अथवा मंदिरे वक्फ बोर्डाच्या कह्यात जातील, याची गणती करणे अशक्य होईल.

हिंदूंचे १०० टक्के मतदान हवे !  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ (म्हणजे विभागले गेलो, तर मारले जाऊ),  असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी हिंदु समाजाला सावधानतेची चेतावणी दिली आहे. ‘एक है तो ‘सेफ’ है’ (एकत्र राहिलो, तर सुरक्षित राहू), असे मोदी म्हणाले. हिंदु समाजापुढे काय भयंकर संकट वाढून ठेवले, ते लक्षात आणून देणार्‍या घोषणा आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करून मते मागितली गेली, त्याचा तडाखा भाजपला बसला. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने हिंदूंना प्रचंड त्रास दिला आहे. हिंदुहिताच्या मागण्या मान्य न करणे, मंदिरांचे सरकारीकरण करणे, मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हे हिंदूंनी पाहिले आहे. काँग्रेसने देशाची केलेली अपरिमित हानी पहाता हिंदूंनीही हिंदूंचे हित करणार्‍या उमेदवारालाच निवडून दिले पाहिजे. मुसलमान समाज इतके एकगठ्ठा मतदान करतो की, तो लोकसभेची जागा जिंकू शकतो. देशात मुसलमानबहुल सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने एकगठ्ठा मतदान झाले आहे. हिंदूंची मते मात्र वाटली गेली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी केवळ १८ जागा मिळू शकल्या. मोदी अनेक कायद्यांमध्ये सुधारणा आणत आहेत. घटनेतील ३७० वे कलम रहित केल्यानंतर आता वक्फ कायद्यात सुधारणा करणारे महत्त्वाचे विधेयक त्यांनी आणले आहे. सध्या आपल्या देशात हिंदू ८० टक्के आहेत; पण हिंदुविरोधी राजकारण चालत राहिले, तर एक दिवस भारतातच हिंदु उपरा होईल, अल्पसंख्यांक होईल. हा धोका ओळखून हिंदूंनी या निवडणुकीत हिंदुहितकारी उमेदवार निवडून दिला पाहिजे. शेजारच्या बांगलादेशातील पंतप्रधानांना पळून भारतात यावे लागले. जे पळू शकत नाहीत, त्या हिंदूंवर तेथे अत्याचार चालू आहेत. भारतात हे होऊ द्यायचे नसेल, हिंदु म्हणून पुढच्या पिढ्यांना जगू द्यायचे असेल, तर हिंदूंनी सावध झाले पाहिजे. या विधानसभा निवडणुकीत हिंदूंना ही संधी आहे. मुसलमानांचे १०० टक्के मतदान होते, तर मग हिंदूंचे १०० टक्के मतदान का होऊ शकत नाही ? ‘मतदानाशी आपल्याला काही देणेघेणे नाही; आपला काय लाभ ? सर्वच पक्ष एकाच माळेचे’, ही मानसिकता हिंदूंनी सोडली पाहिजे.

हिंदूंनो, एकही मत वाया घालवू नका ! 

सामाजिक माध्यमांतून अनेकदा एखादा उमेदवार अथवा पक्ष याविरुद्ध फेक नॅरेटिव्ह (खोटे कथानक) पसरवून मतदारांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो. हे लोकसभा निवडणुकीत हिंदूंनी पाहिले आहे. त्यामुळे हिंदूंनी अतिशय विचारपूर्वक, कुणाच्याही दबावाला बळी न पडता, कोण सत्य आहे ? समाज आणि राष्ट्र यांच्या भल्यासाठी कोण योग्य आहे ? याचा सारासार विचार करून मतदान करायला हवे. हिंदूंनी जे हिंदू मतदान करत नाहीत, त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून मतदान करवून घेतले पाहिजे. मतदानाच्या दिवशी सर्व हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने मतदानाला जावे आणि लोकशाहीचे हात बळकट करावे. हिंदूंनी स्वतःचे नातेवाईक, मित्रमंडळी यांना संपर्क करून योग्य उमेदवाराला मत देण्यास सांगावे. यामुळे इतर मतदारसंघांतही हिंदूंचे कल्याण करणारे उमेदवार निवडून येतील. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. ‘एखाद दुसर्‍याने मतदान केले नाही, तर काय बिघडणार ?’, अशी मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी. एका मतानेही एका चांगल्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. आपल्या एका मतावर योग्य आणि अयोग्य उमेदवाराचे भाग्य अवलंबून असते. मतदानाविषयीची मनातील मरगळ आणि निरुत्साह दूर करून हिंदु मतदाराने मतदान करून योग्य, समाजशील, कर्तव्यनिष्ठ, नागरिकांच्या समस्यांची, देशहिताची जाण असलेल्या उमेदवारालाच स्वत:च्या मताद्वारे निवडून दिले पाहिजे. ज्यामुळे योग्य सरकार सत्तेवर येऊन लोकविकास होण्यास मार्ग सुकर होईल. मतदान सत्पात्री केले पाहिजे. ज्या विचारसरणीने देशाचे भले होणार आहे, अशा विचारसरणीला मतदान करून तीच भारतीयत्वाची, हिंदुत्वाची विचारसरणी पुन्हा एकदा देशातील आणि राज्यातील सत्तेत आली पाहिजे. दुर्जनांच्या हातात जर सत्ता असेल, तर ते उन्मत बनतील. त्यांना सत्तेचा माज येईल आणि ते आपला हिंदु धर्म विसरून जातील.

राष्ट्रहिताचे सरकार निवडून आणा ! 

ज्या वेळी द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, त्या वेळी दुर्योधनाला विचारले गेले की, ‘तुमच्या कुळाच्या सुनेचे वस्त्रहरण झाले, हा अधर्म आहे, हे तुला समजत नाही का ?’ तेव्हा दुर्योधन म्हणाला, ‘‘धर्म काय आहे हे मला ठाऊक आहे; परंतु त्यानुसार आचरण करणे, ही माझी प्रवृत्ती नाही आणि अधर्म काय आहे, हेही मला ठाऊक आहे; परंतु त्यापासून मी निवृत्त होऊ शकत नाही.’’ समाजातील अनेक लोकांची अशाच पद्धतीची परिस्थिती असते. त्यांना ‘कळते; पण वळत नाही’. हिंदूंनी दुर्योधनाच्या विचारसरणीनुसार न वागता ‘मतदान हा आमचा धर्म आहे; म्हणजे ते आमचे कर्तव्य आहे; मी स्वतः मतदानाला जाईन आणि इतरांनाही प्रोत्साहित करीन; आम्ही सगळे मिळून एकगठ्ठा मतदान करू आणि आम्ही राष्ट्रहिताचे सरकार निवडून आणू, अशा पद्धतीचा संकल्प करणे आवश्यक आहे. हिंदूंनो उठा, हे लोकशाहीतील युद्ध जिंका !

मतदान हा धर्म, म्हणजे कर्तव्य समजून राष्ट्रहित जोपासणारे सरकार सत्तेत आणण्यासाठी मतदान करा !