वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणार्या दांपत्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुणे – सम-विषम दिनांक न पहाता (नो-पार्किंग) रस्त्यावर लावलेल्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दुचाकीवर असलेले दांपत्य गणेश सहाणे आणि सौ. सोनम सहाणे यांनी डेक्कन वाहतूक विभागामध्ये येऊन जाब विचारत कर्मचार्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या दांपत्याने पुढील कारवाई टाळण्यासाठी दुचाकीवर बनावट वाहन क्रमांकाची पाटी लावल्याचे उघडकीस आले आहे.
सहाणे दांपत्याने ‘नो-पार्किंग’मध्ये वाहन लावल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई करत वाहन उचलून डेक्कन वाहतूक विभागात आणले. त्यानंतर सहाणे यांनी डेक्कन वाहतूक विभागात येऊन गोंधळा घातला. रस्त्यावर येऊन पोलिसांना शिवीगाळ केली. साहाय्यक निरीक्षक डोंगरे आणि सहकार्यांना ‘तुम्हा दोघांची नोकरी घालवतो’, अशी धमकी दिली. वाहतूक नियम मोडल्यानंतर केलेल्या कारवाईतील थकीत दंडाची टाळण्यासाठी बनावट पाटी लावल्याचे निष्पन्न झाले आहे.