ही निवडणूक हिंदूंच्या अस्तित्वासाठी आहे, हे लक्षात ठेवून मतदान करा ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सभेसाठी उपस्थितांना संबोधित करतांना देवेंद्र फडणवीस आणि व्यासपिठावर उपस्थित अन्य मान्यवर

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – महाविकास आघाडीचे नेते ‘व्होट जिहाद’ची भाषा करणार्‍यांच्या समर्थनार्थ उभे आहेत. ‘व्होट जिहाद’च्या माध्यमातून समाज तोडण्याचे काम चालू असून ते थोपवायचे असेल, तर आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल. ही निवडणूक राहुल आवाडे यांची नसून ती हिंदूच्या अस्तित्वासाठी आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला मतदान करावे लागेल, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या निर्धार सभेत बोलत होते.

या वेळी आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, सद्गुरु बाळ महाराज यांसह अन्य उपस्थित होते. भाजपचे उमेदवार राहुल आवाडे म्हणाले, ‘‘इचलकरंजी आणि परिसरात उद्योग, व्यवसाय वाढत आहे. शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहराला ‘सुळकुड पाणी योजने’ची आवश्यकता असून त्याचा शुभारंभ करावा लागेल. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक योजना संमत करून आणण्यासाठी मला संधी द्या.’’

धर्माला विरोध करणारे लोकही आता ‘रामकृष्ण हरि’ म्हणत आहेत ! – देवेंद्र फडणवीस

जे लोक नेहमी धर्माला विरोध करतात ते लोकही आता ‘रामकृष्ण हरि’ म्हणत आहेत. यातूनच भगव्याचे सामर्थ्य लक्षात येते. कुणी हिंदुत्वाचा आव आणला, तरी कुणाला निवडून द्यायचे, हे जनतेला चांगले कळते.