समष्टी प्रारब्धाचा व्यष्टी प्रारब्धावर होणारा परिणाम !
१. व्यष्टी प्रारब्ध असलेल्या लाखों जिवांमुळे समष्टी प्रारब्धाचा काळ निर्माण होणे
‘अनेक (एक सहस्र) ग्रॅम मिळून एक किलोग्रॅम बनते, तसे तीव्र पापकर्म केलेल्या लाखों जिवांनी त्यांचे प्रारब्धभोग भोगायला एकत्रित जन्म घेतल्यावर त्या काळात समष्टी प्रारब्धाचा काळ निर्माण होतो. ‘समष्टी पुण्य किंवा पाप यांच्या कर्मांची तीव्रता आणि त्यात समष्टीचा सहभाग’ या दोन्ही घटकांनुसार ‘किती काळाने प्रारब्धाचे फळ भोगावे लागणार’, हे ठरते, उदा. ‘लव्ह जिहाद’च्या घटना, भ्रष्टाचार इत्यादी पापांची तीव्रता आणि त्यामध्ये समष्टीचा सहभाग किती आहे ?’, यांवर किती काळाने त्याचे फळ भोगायला मिळणार हे ठरते.
२. समष्टी प्रारब्धामुळे व्यष्टी प्रारब्धावर होणारे परिणाम !
२ अ. मंद व्यष्टी प्रारब्ध असल्यास समष्टी प्रारब्धाचा परिणाम अल्प होणे : समष्टी प्रारब्धामुळे एखादी घटना घडते (उदा. कोरोना महामारी, चक्रीवादळ, युद्ध, अणूबाँब पडणे इत्यादी), त्या वेळी ज्यांचे मंद व्यष्टी प्रारब्ध असेल, त्यांच्यावर २० – ३० टक्के परिणाम होतो, उदा. अस्थिभंग होणे इत्यादी. ज्यांचे मध्यम प्रारब्ध असेल, त्यांचावर ५० – ६० टक्के परिणाम होतो, उदा. अंधत्व येणे, हात किंवा पाय कापावा लागणे इत्यादी; याउलट ज्यांचे तीव्र प्रारब्ध असेल, त्यांच्यावर थेट परिणाम होऊन विविध घटनांमुळे त्यांचा मृत्यू होतो, उदा. भूकंप किंवा अतीवृष्टी इत्यादींमुळे इमारत कोसळून त्याखाली चिरडून मृत्यू होणे, वीज पडल्याने मृत्यू होणे इत्यादी.
२ आ. समष्टी किंवा व्यष्टी स्तरावर केलेल्या उपाययोजनेमुळे समष्टी प्रारब्धाचा परिणाम न्यून होणे : एखाद्या गावात महामारी पसरल्यावर त्याचा परिणाम त्या गावातील प्रत्येक घरात न्यूनाधिक प्रमाणात होतोच. गावातील एखाद्या भागाची स्वच्छता अधिक असेल, तर अन्य ठिकाणांच्या तुलनेत त्या स्थानावर महामारीचा परिणाम अल्प प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे ‘एखाद्या घरातील व्यक्तींनी महामारीपासून रक्षण होण्यासाठी कशी उपाययोजना केली आहे ?’, त्यावरही महामारीचा न्यूनाधिक परिणाम होतो.
३. संतांचे आज्ञापालन केल्यामुळे होणारा लाभ !
असे असले, तरी साधना करणारे द्रष्टा, ज्योतिषी आणि खरे संत यांचे म्हणणे ऐकून ज्यांनी आपत्काळासाठी साधना म्हणून सगळी िसद्धता केली असेल, त्यांच्या साधनेच्या स्तरानुसार त्यांच्यावर होणारे समष्टी प्रारब्धाचे परिणाम ठरतात.
३ अ. मंद प्रारब्ध : ज्या साधकांचे मंद प्रारब्ध असेल आणि त्यांनी साधना म्हणून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर प्रयत्न केले असतील, त्यांच्यावर समष्टी प्रारब्धाचा नगण्य परिणाम होईल, उदा. काही काळ रुग्णाईत होणे; पण वैद्यांनी केलेल्या औषधोपचारामुळे रोग बरे होणे
३ आ. मध्यम प्रारब्ध : ज्या साधकांचे प्रारब्ध मध्यम असेल; पण त्यांनी साधना म्हणून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्व स्तरांवर उत्तम प्रयत्न करून श्री गुरूंची कृपा प्राप्त केली असेल, त्यांचा मध्यम प्रारब्धाचा त्रासही दूर होईल, उदा. अपघात किंवा इतर घटना घडून त्यात नेहमीसाठी थोडीफार शारीरिक हानी होऊ शकेल; पण श्री गुरूंच्या कृपेने प्राणहानी न होता साधना करता येईल.
३ इ. तीव्र प्रारब्ध : ज्या साधकांचे तीव्र व्यष्टी प्रारब्ध असेल; पण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत साधना केली असेल, तर व्यष्टी अन् समष्टी प्रारब्ध असल्यामुळे प्रसंग घडले, तरी त्या साधकाची आध्यात्मिक हानी होणार नाही, उदा. पूर किंवा अपघात यांमुळे प्राण गेले, तरी अंतर्मनातून साधना चालू असल्याने साधनेच्या दृष्टीने चांगली गती आणि उच्च स्वर्गलोक किंवा महर्लाेक येथे स्थान मिळेल.
थोडक्यात व्यक्तीच्या मंद, मध्यम किंवा तीव्र व्यष्टी प्रारब्धानुसार त्याच्यावर समष्टी प्रारब्धाचा परिणाम होतो; पण व्यक्ती साधना करणारी असेल, तर साधनेच्या बळावर ती मंद, मध्यम किंवा तीव्र व्यष्टी प्रारब्धाची झळ न्यून करू शकते.
४. योग्य क्रियमाण वापरण्याचे महत्त्व !
‘स्थूल स्तरावर समाजाच्या रक्षणासाठी केलेली आवश्यक सिद्धता आणि सूक्ष्म स्तरावर स्वतःच्या समवेत समाजाची साधना होण्यासाठी केलेले प्रयत्न’, म्हणजे समष्टी प्रारब्धाच्या अनुषंगाने वापरलेले योग्य क्रियमाण होय. समष्टी प्रारब्धाच्या संदर्भात ‘व्यक्ती योग्य क्रियमाण किती वापरते ?’, यालाही तेवढेच महत्त्व आहे.
४ अ. मंद आणि मध्यम व्यष्टी प्रारब्ध असूनही योग्य क्रियमाण न वापरल्याने होणारी हानी ! : व्यक्तीचे व्यष्टी स्तरावर मंद आणि मध्यम प्रारब्ध असेल; पण त्याने योग्य क्रियमाण न वापरता उलट कृती केल्या, तर समष्टी प्रारब्धामुळे त्याला अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणूबाँबच्या स्फोटामुळे झालेल्या मृतांमध्ये मंद, मध्यम आणि तीव्र प्रारब्ध असलेल्या लोकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे होते.
वरील सारणीतून ‘हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणूबाँबस्फोटामुळे मृत झालेल्यांपैकी ५० टक्के लोकांनी स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर योग्य क्रियमाण वापरले असते, तर त्यांचे प्राण वाचू शकले असते’, असे लक्षात येते.
४ आ. मंद आणि मध्यम व्यष्टी प्रारब्ध असूनही साधना न केल्यामुळे समष्टी प्रारब्ध भोगावे लागणे : मुळात समष्टीला साधनेचे बळ नसल्याने वाईट शक्ती समाजाच्या त्रासात वाढ करतात. हिरोशिमा आणि नागासाकी येथील प्रसंगात वाईट शक्तींनी मंद अन् मध्यम प्रारब्ध असलेल्या लोकांनाही त्यांच्या मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण निर्माण करून अणूबाँबस्फोटाचे परिणाम अधिक होणार्या ठिकाणी नेले.
४ इ. मंद आणि मध्यम व्यष्टी प्रारब्ध असूनही साधना न केल्यामुळे अकाली मृत्यू झाल्यामुळे होणारी हानी ! : साधना न केल्यामुळे, म्हणजेच अयोग्य क्रियमाणामुळे अणूबाँबच्या स्फोटात लाखों जिवांचा प्रारब्धानुसार निश्चित वेळेपूर्वीच मृत्यू झाला, म्हणजे त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ भूलोकातच थांबून विविध यातना सहन करून देवाण-घेवाण फेडावे लागत आहे. याहूनही वाईट गोष्ट, म्हणजे अकाली मृत्यू झालेल्या जवळ जवळ ७० टक्के जिवांना मोठ्या वाईट शक्ती त्यांचे दास करून घेतात आणि त्यांच्याकडून लाखों वर्षांपर्यंत विविध वाईट कार्ये करून घेतात. त्यामुळे अकाली मृत्यू झालेल्या जिवांना खरे पहाता नरकयातनाच सहन कराव्या लागतात. एखाद्या संतांनी त्यांच्यासाठी श्राद्ध इत्यादी धार्मिक विधी करून त्यांना गती दिली, तरच त्यांना पुढच्या लोकात जाता येते.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी योग्य क्रियमाण वापरायला शिकवणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे समष्टीला काळानुसार स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही स्तरांवरील योग्य क्रियमाण वापरण्याची, म्हणजेच आपत्काळाला सामोरे जाण्याची शिकवण देत आहेत. आम्हाला लाभलेल्या अशा दिव्य श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (८.३.२०२४)
|