गीतकार जावेद अख्तर यांच्या विरुद्ध प्रविष्ट (दाखल) केलेली मानहानीची तक्रार याचिकाकर्त्याने मागे घेतली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याचे प्रकरण

गीतकार जावेद अख्तर

मुंबई – एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात संघाचे कट्टर समर्थक अधिवक्ता संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. ती त्यांनी आता मागे घेतली आहे.

अधिवक्ता दुबे यांनी काही दिवसांपूर्वी अख्तर यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर अर्ज केला होता. त्यात दोन्ही पक्षकारांनी परस्पर सहमतीने न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवल्याचे सांगितले. त्यामुळे ‘अख्तर यांच्या विरोधात खटला चालवू इच्छित नाही’, असेही म्हटले होते.

काय आहे प्रकरण ?

जावेद अख्तर मुलाखतीत म्हणाले होते, ‘संघाची विचारसरणी तालिबान्यांसारखी आहे. संघ नागरिकांची दिशाभूल आणि मानसिक खच्चीकरण करत आहे.’ अख्तर यांच्या या वक्तव्यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा आरोप करून संघाचे कट्टर समर्थक अधिवक्ता संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्या विरोधात मानहानीची फौजदारी तक्रार प्रविष्ट केली होती. अख्तर यांनी राजकीय हेतूने संघाच्या नावाचा अनावश्यक वापर केल्याचेही दुबे यांनी तक्रारीत म्हटले होते.