निवडणूक आयोगाकडून भाजपला प्रचाराचे विज्ञापन असणारा व्हिडिओ हटवण्याचा आदेश
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले झारखंड मुक्ती मोर्चाच्या समर्थकाच्या घरावर मुसलमान घुसखोरांनी बलपूर्वक केलेले अतिक्रमण !
रांची (झारखंड) – निवडणूक आयोगाने झारखंडच्या भाजप शाखेला त्यांच्या एका निवडणूक विज्ञापनासाठी प्रसारित केलेला व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली. हा व्हिडिओ आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे, तसेच भाजपाला नोटीसही बजावण्यात आली आहे.
१. हा व्हिडिओ झारखंडमधील भाजपने त्यांच्या ‘एक्स’वरील खात्यावरून प्रसारित केला होता. त्यात ‘झारखंड मुक्ती मोर्चाच्या कथितपणे समर्थकाचे घर दाखवण्यात आले आहे. मोठ्या संख्येने घुसखोर मुसलमान या घरात घुसतात आणि बलपूर्वक तेथे राहू लागतात. ते घर कह्यात घेतात आणि घरातील कुटुंबाला गोंधळात टाकतात’, असे दाखवण्यात आले आहे.
२. या व्हिडिओमध्ये २ स्थानिक लोक झारखंड मुक्ती मोर्चाच्या समर्थकाच्या घरी येतात. जेव्हा घरमालक त्याच्याकडे तक्रार करतो की, ‘घुसखोर त्याचे घर उद्ध्वस्त करत आहेत’, तेव्हा स्थानिक लोक म्हणतात की, तुम्ही निवडलेल्या (झारखंड मुक्ती मोर्चा) सरकारने या लोकांना येथे आणले आहे, तर तुमचे घरही पाडले पाहिजे, केवळ आमची वसाहतच का ?
३. झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या कार्यकाळात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना सर्व प्रकारचे साहाय्य करून त्यांना राज्यात वसवण्यात आल्याच्या विरोधात हे विज्ञापन करण्यात आले होते.