Vedant Patel On Cricket : भारत आणि पाक यांच्यातील सूत्र त्यांनीच सोडवावे !
पाकमधील क्रिकेट स्पर्धेत सहभागी न होण्याच्या भारताच्या निर्णयाविषयी अमेरिकेला प्रश्न विचारणार्या पाकिस्तानी पत्रकाराला अमेरिकेचे उत्तर !
वॉशिंग्टन (अमेरिका) – पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने अप्रसन्नता व्यक्त केली आहे. या संदर्भात एका पाकिस्तानी पत्रकाराने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दैनिक पत्रकार परिषदेत भारताच्या नकाराचे सूत्र उपस्थित केले. यावर अमेरिकेने थेट उत्तर देत ‘हा दोन देशांतील प्रश्न असल्याने त्यांनीच तो आपापसांत सोडवावा’, असे स्पष्ट केले.
१. पाकिस्तानी पत्रकाराने विचारले की, ‘पाकिस्तानमध्ये एक मोठी क्रिकेट स्पर्धा होणार आहे.’ यावर अमेरिकेच्या सरकारचे उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले, क्रिकेट ? अरे, ते माझ्या कार्यक्षेत्रात नाही. पुढे विचारा.’
२. पत्रकार पुढे म्हणाला की, भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. खेळात राजकारण मिसळणे, ही चांगली कल्पना आहे, असे तुम्हाला वाटते का ? यावर तुमचे मत काय आहे ?
३. यावर वेदांत पटेल यांनी स्पष्ट केले की, हे सूत्र पूर्णपणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आहे; कारण अमेरिका अशा सूत्रांविषयी भूमिका घेत नाही. हे प्रकरण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असल्याने त्यांनाच ते सोडवावे लागेल. त्यांच्या द्विपक्षीय संबंधांविषयी बोलण्याचे दायित्व मी त्यांच्यावर सोपवोतो. आमच्यासाठी यात सहभागी होण्यासारखे काहीच नाही; परंतु खेळ हा निःसंशयपणे एकसंध शक्ती आहे.