महाराष्ट्र दौरा अचानक रहित करून अमित शहा देहलीत !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नागपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात सभा घेत आहेत; मात्र १६ नोव्हेंबर या दिवशी त्यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रहित करण्यात आला. काही अपरिहार्य कारणाने दौरा रहित करत असल्याचे सांगण्यात आले. ते तातडीने देहली येथे रवाना झाले. यामुळे अमित शहा यांच्या गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतील काटोल अन् सावनेर या मतदारसंघात होणार्‍या ४ सभा रहित करण्यात आल्या आहेत.

माओवाद्यांचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणून पूल उडवून देण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला आहे. माओवाद्यांनी छत्तीसगड सीमेवरील नक्षलप्रभावित भामरागड आणि ताडगाव या गावांना जोडणार्‍या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्फोटकांचा शोध घेऊन ती निकामी करण्यासाठी गडचिरोलीहून एक बाँब शोधक आणि नाशक पथक हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठवण्यात आले. भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ नवीन पुलाचे बांधकाम चालू आहे. १७ नोव्हेंबर या दिवशी गृहमंत्री अमित शहा प्रचारसभेसाठी गडचिरोली येथे येणार होते. नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणायचा होता, असा संशय पोलिसांना आहे.

अमित शहा यांनी १५ नोव्हेंबर या दिवशी चंद्रपूर येथील सभेत ‘गडचिरोली येथील नक्षलवाद संपुष्टात आला असून ३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवाद संपवू’, अशी घोषणा केली होती. त्यानंतर ते १७ नोव्हेंबर या दिवशी गडचिरोली येथे येणार होते. या घोषणेनंतर काही घंट्यांतच भामरागडमधून स्फोटके नष्ट केल्याचे वृत्त आले. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.