देव, देश आणि धर्म यांसाठी स्वतः धर्माचरणी होऊन समाजाला संघटित करायला हवे ! – महेश लाड, हिंदु जनजागृती समिती
माहीम येथे हिंदु जनजागृती समितीचे ५ दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबिर
माहीम – देशातील हिंदूंची स्थिती पहाता आपण सर्वांनी संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षण हे प्रत्येक हिंदु युवक-युवती यांचे दायित्व आहे. यासाठी आपण धर्मशिक्षण घेऊन ईश्वराचे पाठबळ मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे. स्वतः धर्माचरणी होऊन हिंदु समाजाला संघटित केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. महेश लाड यांनी केले. ६ ते १० नोव्हेंबर या दीपावली सुटीच्या कालावधीत समितीच्या वतीने येथे आयोजित ५ दिवसांच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या शेवटच्या दिवशी ते बोलत होते.
या शिबिरात कराटे, दंड साखळी यांचे प्रशिक्षण देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांची उदाहरणे देऊन मानसिक बळ वाढवण्यासाठी प्रसंगांचा अभ्यास करून घेण्यात आला. धर्माचरण करण्याचे महत्त्व, साधनेची आवश्यकता यांविषयी मार्गदर्शन देऊन प्रशिक्षणार्थींकडून प्रत्यक्ष कृती करून घेण्यात आली.
क्षणचित्र – स्थानिक धर्मप्रेमी श्री. दत्ता कानेरे यांनी काही मुलांना शिबिरात सहभागी होण्यासाठी उद्युक्त केले.
पालकांचे अभिप्राय
१. श्री. उन्मेष बैकर – समितीचे कार्य प्रशंसनीय आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांमध्ये प्रतिकाराची क्षमता निर्माण होईल.
२. सौ. केयूर – माझी मुलगी कॉन्व्हेंट शाळेत शिकलेली असल्यामुळे तिला कुंकू लावण्याची सवय नाही; पण आता येथे सांगितल्याप्रमाणे मी तिच्याकडून ही कृती करून घेईन. आपण मुलांवर आपल्या सणांचे महत्त्व बिंबवायला पाहिजे. समितीचे कार्य चांगले आहे.