दिवा येथे आयोजित गडदुर्ग बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला !
‘मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक’ संघटनेने केले होते आयोजन
ठाणे – तरुणांमध्ये गडदुर्गांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ‘मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक’ संघटनेच्या वतीने दिवाळीच्या काळात दिवा शहरात गडदुर्ग बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेत १०४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
१. छत्रपती शिवाजी महाराज आणि गडदुर्ग यांचा इतिहास, तसेच त्यांचे संवर्धन यांविषयीची माहिती नवीन पिढीला मिळावी, हा या स्पर्धेचा व्यापक उद्देश आहे.
२. स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘शिवबा राजं प्रतिष्ठान’ला मिळाला. त्यांनी गड पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड रणसंग्राम असा देखावा सिद्ध केला होता. द्वितीय पारितोषिक ‘आई एकविरा’ गटाला मिळाला. त्यांनी मल्हारगडाची प्रतिकृती बनवली होती. तृतीय पारितोषिक ‘अचानक मित्र मंडळा’ला मिळाले. त्यांनी पद्मदुर्गाची प्रतिकृती साकारली होती, तर चतुर्थ पारितोषिकाचा मान ‘कोकण वॉरियर्स’ यांना मिळाला. त्यांनी सिंधुदुर्ग साकारला होता.
३. या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल शिंदे, तसेच शिव व्याख्यात्या सायली पाटील, श्री. अजित भगत, श्री. उमेश भारती, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत सुर्वे, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ‘मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. राहुल खैर आणि पदाधिकारी उपस्थित होते.