गोव्यातील वेश्याव्यवसायाची पाळेमुळे गाझियाबादपर्यंत !
|
पणजी, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने संकेतस्थळाचा वापर करून गोव्यात वेश्याव्यवसाय करणार्यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने ‘दीपिका वर्मा डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ चालवून ‘ऑनलाईन’ वेश्याव्यवसायाचे जाळे चालवणारा गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील संशयित योगेश कुमार याला कह्यात घेतले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने सायबर गुन्हे विभागाच्या साहाय्याने आतापर्यंत अशा प्रकारची ४० हून अधिक संकेतस्थळे बंद (ब्लॉक) केलेली आहेत.
पोलिसांच्या अन्वेषणातून मिळालेल्या माहितीनुसार संशयित योगेश कुमार गाझियाबाद येथून हे संकेतस्थळ चालवत होता. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचे आणि ग्राहकांना विशेष यंत्रणेच्या माध्यमातून वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवण्याचे कामही संशयित करत होता. याविषयी माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील एक गट गाझियाबाद येथे गेला. या गटाने गाझियाबाद पोलिसांच्या साहाय्याने संशयिताच्या ठिकाणावर छापा टाकला आणि त्याला कह्यात घेतले. या वेळी संशयिताचा संगणक आणि संगणकातील माहिती (डाटा) ज्या ठिकाणी साठवून ठेवण्यात आली होती, ती पोलिसांनी कह्यात घेतली आहे. संशयिताला गोव्यात आणण्यात आले आहे.
संकेतस्थळावरून कसा चालत होता वेश्याव्यवसाय?
‘दीपिका वर्मा डॉट कॉम’ हे संकेतस्थळ अगदी लक्षवेधी करण्यात आले होते. त्यावर संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला होता. या संकेतस्थळाच्या माध्यमातून गोव्यातील पर्यटकांना लक्ष्य केले जात होते. वेश्याव्यवसायाचे विज्ञापन संकेतस्थळावर होते. पर्यटकांनी संबंधित क्रमांकावर संपर्क केल्यावर दलाल त्यांना मुली पुरवत असे. मुलींची छायाचित्रे संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली गेली होती; मात्र ही छायाचित्रे खरोखरच पीडित मुलींची आहेत कि ती इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली आहेत, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत. या संकेतस्थळावर ज्यांनी संपर्क केलेले आहेत त्या सर्वांचे संपर्क क्रमांक सध्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे आहेत. त्यामुळे या संकेतस्थळाला संपर्क केलेले अडचणीत आले आहेत.