त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य !
१ लाख २५ सहस्र दिव्यांची आरास
पुणे – ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपति मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची आकर्षक आरास आणि विविध रसस्वादाच्या ५२१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपति मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभार्यापर्यंत सुमारे १ लाख २५ सहस्र दिव्यांनी संपूर्ण मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला.
या वेळी सुनील रासने म्हणाले की, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार आहे.