अहिल्यानगर येथे शस्त्रसाठ्यासह ९ काश्मिरी तरुणांना अटक !

९ रायफली आणि ५८ काडतुसे कह्यात

शस्त्रसाठ्यासह ९ काश्मिरी तरुणांना अटक

अहिल्यानगर – येथे मूळ काश्मीर येथील असलेल्या ९ तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९ रायफली आणि ५८ काडतुसे अन् बनावट शस्त्र परवाने कह्यात घेतले आहेत. पोलिसांना अधिक शस्त्रसाठा सापडण्याची शक्यता आहे. सैन्याचा गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलीस यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. या टोळीचा मुख्य सूत्रधार महंमद गुज्जर याने शहरातील तारकपूर भागात मूळच्या राजौरीच्या शेरखान याच्याकडून वर्ष २०१५ मध्ये बनावट शस्त्र परवाना आणि १२ बोअरवेलची रायफल खरेदी केली होती. (एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडतात, म्हणजे त्यांचा निश्‍चितच काहीतरी घातपाताचा डाव दिसतो. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)

अहिल्यानगर शहर आणि आजूबाजूच्या भागात जम्मू-काश्मीर राज्यातील काही जण बनावट कागदपत्रांद्वारे सुरक्षारक्षकाची नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सैन्याचा गुप्तचर विभागही त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. या ९ आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.